अपयशी ठरलेल्या भाजपाला सत्तेबाहेर खेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:36 AM2019-03-21T00:36:22+5:302019-03-21T00:37:06+5:30
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांवर अन्याय केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत.
नांदेड : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांवर अन्याय केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत. व्यापारी, शेतकरी, शेजमजूर व अल्पसंख्याक यांच्या मुळावर उठलेल्या या भाजप सरकारला सत्तेबाहेर खेचा असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.
येथील ए.के.संभाजी मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित लिंगायत समाजाच्या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ. अमिताताई चव्हाण, आ.वसंतराव चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हरिहरराव भोसीकर, माजी महापौर शैलजा स्वामी, स्थायीचे माजी सभापती किशोर स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने सर्व जातीधर्माला समान न्याय देण्याचे काम केले आहे. संधी मिळेल तेव्हा लिंगायत समाजातील व्यक्तींनाही सन्मानाचे पद दिले. महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नांदेड शहरात व्हावा ही समाजबांधवांची मागणी पूर्ण करण्यासाठी मनपाने पावले उचलली असून पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देवून या धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने घेतला आहे. महाराष्टÑात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्हीही हा दर्जा देवू असा शब्द खा. चव्हाण यांनी यावेळी दिला. लिंगायत समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काँग्रेस सरकारने निर्णय घेतला. त्याचा फायदा आता होत आहे. या समाजातील काही पोटजातीला अद्याप याचा लाभ मिळत नाही. तोही लवकरच देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. मेळाव्याला जि.प.सभापती माधवराव मिसाळे, माजी तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे, माजी जि.प.सदस्य माधवराव बेळगे, जि.प.सदस्य संजय बेळगे, तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, प्रवक्ते संतोष पांडागळे, जि.प.सदस्य अनिल पाटील खानापूरकर, माजी जि.प.सदस्य संजय भोसीकर, माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे, माजी उपनगराध्यक्ष राजीव शेट्टे, बच्चुराज देशमुख, चंदापुरे, बालाजी बंडे, महावीर शिवपुजे, अॅड.बाबूराव देशमुख, उद्योजक माधवराव पटणे, बाबूराव सायाळकर, दिलीप डांगे, उज्वल केसराळे, सदाशिवराव बुटले, शेषराव दंडे, महेश स्वामी, व्यंकटेश बारूळे, संतोष दगडगावकर, शंकरराव कंगारे, सुभाष देशमुख आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार संतोष पांडागळे यांनी मानले.