अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा आवश्यक
By admin | Published: November 5, 2014 01:27 PM2014-11-05T13:27:14+5:302014-11-05T13:27:14+5:30
जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे.
Next
नांदेड : जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे. अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली.
जिल्ह्यात ३५२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अर्धापूर तालुक्यातील ५१ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुसर्या टप्प्यात ५२ अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ५२ अंगणवाड्यांची आज मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. उद््घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी यु. टी. तोटावाड, नाईक, श्रीमती गिरगावकर, पांडलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटकीय भाषणात काळे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या आयएसओ होणार नाहीत, ही वास्तविकता आहे. पण त्या बोलक्या झाल्या पाहिजे याची खबरदारी घ्यावी असे ते म्हणाले. यातून विद्यार्थ्यांना अंकगणित, मुळाक्षरे असे प्राथमिक ज्ञानतरी मिळणे आवश्यक आहे. प्रास्ताविकात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी महिला व बालकल्याण विभागाकडून २0१३-१४ मध्ये राबविलेल्या कुपोषणमुक्त गाव मोहिमेच्या यशस्वीतेबाबत सांगताना आयएसओ मानांकनातही जिल्हा चांगली कामगिरी बजावेल असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याने डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होईल असेही ते म्हणाले.
अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, मदतनीस, सेविका यांना आयएसओसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दुसर्या टप्प्यात कंधार तालुक्यातील २0, नांदेड- १२, बिलोली, हदगाव व माहूर तालुक्यातील प्रत्येकी ५, मुदखेड- ४ आणि अर्धापूर तालुक्यातील 0२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सोनवणे, खंदारे, उपलंचवार आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)