शहरातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:20+5:302021-07-20T04:14:20+5:30
शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी दाेन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही एकाच वेळी सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत. ...
शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी दाेन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही एकाच वेळी सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत. प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहेच, अंतर्गत रस्ते तर पायी चालण्यासही कसरत करावे असे आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून दाेन वर्षांत जवळपास पाच काेटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. या खर्चातून बुजविण्यात आलेले खड्डे हा संशाेधनाचा विषय आहे. खर्च करूनही रस्त्यावरील खड्डे न बुजल्याचे चित्र आहे. आता पुन्हा पावसाळ्यानंतर खड्डे बुजविले जातील असे स्पष्टीकरण मनपाकडून दिले जात आहे. देगलूर नाका भागातून बाहेर गावावरून येणारी वाहने दाखल हाेतात. त्याचवेळी नमस्कार चाैकातूनही शहरात प्रवेशाचा मार्ग आहे. या दाेन्ही रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे बुजविल्यानंतरही पावसाने पुन्हा ‘जैसे थे’ अवस्था झाली आहे. नवीन पूल, गाेवर्धन घाट पूल या रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येत आहेत. नवीन नांदेडातील रस्त्यांच्या अवस्थेबाबतही हेच चित्र आहे. साईबाबा कमान ते दूध डेअरी, सिडकाेचा मुख्य रस्ताही खड्डेमय झाला आहे. ड्रेनेजसाठी खाेदलेल्या खड्ड्याची डागडुजी झालीच नाही.
चाैकट.....
रस्ते विकासासाठी ५० काेटींचे विशेष अनुदान
शहरातील रस्ते विकासासाठी राज्य शासनाने नांदेड महानगरपालिकेला ५० काेटींचे विशेष अनुदान दिले आहे. या अनुदानातून हाेणारे रस्ते महापालिकेकडून न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचे शासन आदेश हाेते. या निर्णयामुळे महापालिकेतील नगरसेवक असंतुष्ट हाेते. मात्र, याबाबत कुणीही उघडपणे भूमिका मांडली नाही. ५० काेटींच्या अनुदानातून रस्त्यांचे आराखडेही तयार केले हाेते. मात्र, ही कामे कुठे झाली याबाबत शहरवासीय अनभिज्ञच आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे कधी सुरू हाेणार की पूर्ण झाले, याबाबतही माहिती पुढे आली नाही. यामुळे शहरातील एकूण रस्त्यांची अवस्था पाहता विशेष अनुदानाचा वापर अन्य कामांसाठी केला की काय, असा प्रश्न पुढे आला आहे. अनुदानातून तरी रस्ते चकचकीत हाेतील ही अपेक्षाही भंग झाली.