हदगाव तालुक्यातील सात गावांचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:31 AM2019-01-07T00:31:37+5:302019-01-07T00:32:04+5:30
हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़
पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़ १ जानेवारीपासून या गावांचा समावेश होणार होता़ मात्र, हा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे़
‘त्या’ सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या १९ वर्षांपासून होती. त्यासाठी ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनस्तरावर लढा देवून ही गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याचा लढा यशस्वी झाला होता. तसेच शासनाकडून त्या गावांचा समावेश करण्याची अधिसूचनाही जारी केली होती.
हदगाव तालुक्यातील ही सात गावे तालुका पातळीपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर होती. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अधार्पूरलाच होत आहेत. यामुळे अधार्पूर तालुका निर्मितीपासून ही 'सात' गावे अर्धापूूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायत समोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दखल घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेण्यात येऊन सदर मागणी केली होती. बैठकीस पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. ही लढाई पुन्हा सातत्याने चालूच ठेवत विद्यमान आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे ९ आॅगस्ट २०१६ रोजी बैठक घेण्यात आली.
हदगाव तालुक्यातील सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली़ १ जानेवारी २०१९ पासून हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा, चाभरातांडा या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश होणार होता. पण प्रशासकीय तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा समावेश पुन्हा लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.
हदगाव ६० कि़मी. वर तर अर्धापूर ६ कि़ मी़ अंतरावर
हदगाव तालुक्यातील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होत़ यामुळे या सात गावांतील शेतकरी , विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व निराधार यांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हत़े़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता़ तर अर्धापूूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांचे सर्वच व्यवहार अर्धापूूरलाच होतात़
हदगाव तालुक्यातील निमगाव, चाभरा, चोरंबा, सोनाळा, खैरगाव, रोडगी, चाभरातांडा ही सात गावे १ जानेवारी २०१९ ला अर्धापूर तालुक्यात समाविष्ट होणार होती. परंतु, मंत्रालयात महसूल विभागातील सचिवांकडे उशिरा फाईल पोहोचल्यामुळे चार आठ दिवसांचा अवधी लागणार असल्याने सात गाव संघर्ष समिती मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण व सचिव दिगंबर मोळके यांनी दिली.