नांदेडमध्ये मतदानासाठी रांगा; दुपारी एक वाजेपर्यंत ३२.९३ टक्के मतदान
By प्रसाद आर्वीकर | Published: April 26, 2024 03:10 PM2024-04-26T15:10:49+5:302024-04-26T15:11:32+5:30
शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांग लागल्याचे पहावयास मिळाले.
नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात ३२.९३ टक्के मतदान झाले आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास संपूर्ण जिल्हाभरात मतदानाचा वेग अधिक होता.
नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७.७३ टक्के, ११ वाजेपर्यंत २०.८५ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३२.९३ टक्क्यांवर पोहोचली. शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांग लागल्याचे पहावयास मिळाले. किनवट तालुक्यामध्ये दोन ठिकाणी मतदान न करण्यावर ग्रामस्थ अडून बसले आहेत. प्रशासन त्यांची समजूत घालत आहे.
किनवट तालुक्यातील पांगरपहाड येथे भौतिक सुविधांचा अभाव असल्याने मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. तर नवाखेडा (घोटी) येथे स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करावी, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी केवळ दोन मतदान झाले होते. अंबाडी तांडा येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने अर्धा तास मतदान बंद होते.
दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात ३२.९३ टक्के मतदानात झाले. त्यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघात ३३.५२ टक्के , देगलूर ३०.८२ टक्के, मुखेड ३१.७२ टक्के, नायगाव ३०.६८ टक्के, नांदेड उत्तर ३१.८२ टक्के आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ३६.१५ टक्के मतदान झाले. दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदानाचा वेग काहीसा मंदावला आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदान अधिकारी अधिकाऱ्यांना मतदारांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे पहावयास मिळाले.
मतदान यंत्रात बिघाड
हदगाव तालुक्यातील कोळी येथे मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्र क्रमांक ३७ मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यानंतर तब्बल दीड तासानंतर मशीन सुरू झाल्याने मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. आज लग्न तिथी असल्याने मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती; परंतु यंत्र बंद पडल्याने एकच गोंधळ उडाला.