कोट्यधीश झाले अन् नातेवाईकांनी कोर्टात खेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:14 AM2018-08-04T00:14:47+5:302018-08-04T00:15:20+5:30
हदगाव तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी तालुक्यातील १३ गावातील ५४ हजार ४५१७ हेक्टर आर जमिन संपादन करण्यात आली. जमिनीच्या मावेजापोटी २४२ शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. रातोरात शेतकरी कोट्यधीश झाले. दरम्यान, याच पैशावरुन आता घराघरात वाद निर्माण झाले आहेत. कोर्ट कचेऱ्याचेही प्रमाण वाढले.
सुनील चौरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : हदगाव तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी तालुक्यातील १३ गावातील ५४ हजार ४५१७ हेक्टर आर जमिन संपादन करण्यात आली. जमिनीच्या मावेजापोटी २४२ शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. रातोरात शेतकरी कोट्यधीश झाले. दरम्यान, याच पैशावरुन आता घराघरात वाद निर्माण झाले आहेत. कोर्ट कचेऱ्याचेही प्रमाण वाढले.
हदगाव, गोेजेगाव, अंबाळा, चोरंबा, पळसा, बरडशेवाळा, बामणी, चिंचगव्हाण, शिबदरा, मनाठा, चोरंबा जा़, वाकोडा आदी गावातील १२, १६८१ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्गात गेली. मोबदल्यापोटी उपरोक्त गावातील शेतकऱ्यांना १४५ कोटी रुपये मिळाले आहे. मिळालेल्या पैशातून अनेक शेतकऱ्यांनी व्यवसाय सुरु केला, उर्वरित शेतीमध्ये पाण्याची सोय करुन सुधारणा केली, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, मुलगा उच्च पदावर जावा, यासाठी मुलांना नांदेडला ठेवून त्यांना पैसा पुरविणे सुरु केले, मात्र मोबादल्याच्या रक्कमेमुळे काही घरात वादही सुरु झाले. भांडणतंटे वाढले, कोर्ट कचेऱ्याचे प्रमाणही वाढले.
अनेक शेतकऱ्यांच्या बहिणींनी या मावेजामध्ये आपला हक्क सांगत भावाच्या विरोधात कोर्टाची पायरी चढली. कित्येकांनी वकीलांचा सल्ला घेवून वडिलांकडून मृत्यूपूर्वी वाटणीपत्र करुन सावत्रभाऊ, बहिणी यांना बेदखल केले आहे. भावाभावात भांडणाच्या प्रकारात पळसा चर्चेत आला. या गावात सर्वात जास्त वाद सुरु आहेत. शिबदरा, करमोडी, बामणी, मनाठा या गावातही वाद सुरु आहेत. मनाठा येथील एका शाळेला मिळालेल्या मोबदल्याच्या रक्कमेवर दोन समित्यांनी दावा दाखल केला आहे. संबंधित अधिकारी तारीख पे तारीख देत आहेत.
----
कनकेवाडीत: भलताच प्रकार
काहींनी रस्त्यालगत असलेल्या जमिनीत प्लॉटींग पाडून विना लेआऊट त्याची विक्री केली. गरजूंनी ती खरेदीही केली. मात्र अनेकांकडे रजिस्ट्री नसल्याने मावेजा मिळण्यासाठी अशांच्या अडचणीत वाढ झाली. नमुना नं. ८ ला नावे लावण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचा भाव वधारला. ज्यांनी ‘दक्षिणा’ देवून नोंद केली, अशांना परतावा मिळतो, पण ज्यांची नोंद नाही, त्यांना उपविभागीय अधिकारी, शेतमालकाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. हदगाव तालुक्यातील कनकेवाडी तर भलताच प्रकार घडला. एकाच प्लॉटचे दोन- दोन मालक आहेत. यामुळे उपविभागीय अधिकारीही चक्रावले आहेत. शेतमालकाकडेही नमुना नं ८ ची नोंद, प्लॉट खरेदीदाराकडेही त्याच प्लॉटची नोंद आढळल्याने मोबदला द्यायचा कोणाला? खरा मालक कोण? यात दोष कोणाचा? संबंधित ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कारवाई होणार की? त्यावर काही तोडगा काढण्यात यश येणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकूणच ताट वाढून तयार आहे, मात्र खाता येत नाही, अशी परिस्थिती अनेकांची यानिमित्ताने झाली आहे़