जिल्ह्यात १ लाख ९२ हजार हेक्टरवर रबी पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:48 AM2020-12-04T04:48:43+5:302020-12-04T04:48:43+5:30
जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रबीच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात ...
जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रबीच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी रबी हंगामावर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनानेही रबी हंगामावर लक्ष केंद्रित करून रबीचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन केले होते. कृषी विभागाने रबीसाठी लागणारे बियाणे व खताचे नियोजनही करण्यात आले होते. जिल्ह्याचे रबी पिकांचे सरासरी क्षेत्र १ लाख ४० हजार हेक्टर असून, यात हरभरा पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र ८८ हजार हेक्टर आहे. आजपर्यंत सरासरी १३७ टक्क्यांनुसार १ लाख ९२ हजार १८० हेक्टरवर रबीमध्ये पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक १ लाख ५४ हजार १९ हेक्टरवर हरभरा पेरला आहे, तसेच रबी ज्वारी २१ हजार ४०६ हेक्टर, गहू ११ हजार ४६१ हेक्टर, मका १ हजार ५७५, करडी २ हजार ३२१, तीळ ६ हजार, जवस ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यालगतच्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे रबी पिकांसह बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी करावी, तसेच उन्हाळी हंगामात उन्हाळी ज्वारी, भुईमूग पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करावी, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.