अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणाऱ्या रॅकेटचा फर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 07:30 PM2020-06-18T19:30:59+5:302020-06-18T19:33:50+5:30
मुलींना फूस लावून पळविणे व त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करणारे रॅकेट उघड
लोहा (जि.नांदेड) : लोहा व परिसरासह राज्यात मुलींना फूस लावून पळविणे व त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा लोहा पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. यात चार महिला व तीन पुरुषांना गजाआड केले आहे. पीडितेच्या आईने चार महिन्यांपूर्वी लोहा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
इंदिरानगर येथील ३५ वर्षीय महिलेने ४ फेब्रुवारी रोजी लोहा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ‘माझ्या मुलीस आरोपी कमलबाईने फूस लावून पळवून नेले, मुलीला अनैतिक व्यवहार करायला लावत आहेत. याबाबत मी विचारले असता, मला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.’ तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपीची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत मिळविली. आरोपी तान्याबाई ऊर्फ विमलबाई अशोक जाधव (वय ४८ रा. पेनूर ता. लोहा) हिस पेनूर येथून तर कमलाबाई मोहन ऐंगडे (वय ४८, रा. इंदिरानगर लोहा) यांना हैदराबाद येथून दहा दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर रॅकेटमधील इतर आरोपींपैकी विमलबाई खंडू पाईकराव (५५, रा. बेलानगर, नांदेड) व महानंदाबाई रोहिदास वाटोरे (वय ४५, रा. पांडुरंगनगर, नांदेड) यांना नांदेड येथून ताब्यात घेतले.
या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर गेनूभाऊ आबाजी हिंगे (रा. अवसारी जि. पुणे), मदन किशन गिरी (रा. सतेगाव ता. पालम) व राहुल बंडूराव ढवळे (रा. विष्णूनगर नांदेड) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लोहा पोलीस ठाण्याचे पो. नि. भागवत जायभाये, सपोनि रवींद्र कºहे, पोउपनि गुलाबसिंह राठोड, पोहेकॉ बालभारती, वसंत केंद्रे, बलवान कांबळे, शेषराव शिंदे, सविता जोंधळे आदींसह पोलीस पथकाने सदर कामगिरीत सहभाग घेतला.
आणखी आरोपी असण्याची शक्यता
च्रॅकेटमध्ये इतरही आरोपी असावेत, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या रॅकेटमधील आरोपींविरुद्ध पालमसह इतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी विकणे आदीप्रकरणी गुन्हा नोंद आहे.