बिलोली तहसीलमध्ये वाळू लिलावावरून राडा; १० जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:26 PM2018-03-20T18:26:11+5:302018-03-20T18:26:11+5:30
बिलोली तालुक्यातील कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज तहसील कार्यालयात लिलाव झाला.
नांदेड : बिलोली तालुक्यातील कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज तहसील कार्यालयात लिलाव झाला. या लिलावास काही स्वातंत्र्यसैनिक व युवक कॉंग्रेसच्या केदार पाटील सोळुंके यांनी विरोध दर्शवला. यातून त्यांनी तहसीलमध्ये गोंधळ घातला व शासकीय वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी सोळुंकेसह इतर ९ जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध वाळू साठ्यावर धाड टाकली होती. यातून जवळपास दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू साठा जप्त करण्यात आला. या साठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आज लिलाव करण्यात आला. याच दरम्यान काही स्वातंत्र्यसैनिक व युवक कॉंग्रेसचे केदार पाटील सोळुंके यांनी या लिलावास विरोध दर्शवला. तहसीलच्या दरवाज्यास कुलूप लावून त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन सुरु ठेवले. पुढे सोळुंके हे अधिक आक्रमक झाले व त्यांनी तहसील कार्यालयात गोंधळ घातला. यात आंदोलकांनी तहसीलच्या चारचाकीवर दगडफेकही केली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले.
तहसील प्रशासनाची पोलिसात तक्रार
याच दरम्यान तहसीलमध्ये सगरोळी पंचायत समिती गणाच्या निवडणूकीचे काम सुरु होते. यातच हा गोंधळ सुरु झाला. या प्रकरणी तहसील प्रशासनाने गोंधळ घालणाऱ्या दहा जणांविरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा पोलिसांना सादर केले. प्रशासनाच्या तक्रारी वरून केदार पाटील सोळुंके, बाळू पाटील शिंदे सह दहा जणांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी धर्माबादचे उप पोलिस अधीक्षक नुरुल हसन बिलोलीत दाखल झाले आहेत.
कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
यासोबतच तहसील मधील गोंधळ व तहसीलदारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसील कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत काम बंद आंदोलन केले.