राहुल गांधी बुद्धिमान पण त्यांचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा एजंट: प्रकाश आंबेडकर
By शिवराज बिचेवार | Published: April 19, 2024 05:43 PM2024-04-19T17:43:41+5:302024-04-19T17:43:41+5:30
काँग्रेस किंवा भाजप या पक्षांनी एकाही गरीब मराठ्याला लोकसभेची उमेदवारी दिली नाही.
नांदेड-निवडणुक रोखे प्रकरणात काँग्रेसचे दुर्दैव आहे. सर्व कागदपत्रे आल्यानंतर काँग्रेस प्रधानमंत्री मोदींवर तुटून पडेल असे वाटले. परंतु, काँग्रेस मूग गिळून गप्प बसली आहे. बिचाऱ्या राहुल गांधींचेही वाईट वाटते. बुद्धीमान असूनही त्यांना असिस्टंट लागतो. राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर हा भाजपाचा असल्याची मला शंका येते. कारण चार हजार किलोमीटर चालून आला. अन् मुंबईच्या सभेत आमची लढाई मोंदीशी नसून अदृश्य शक्तींशी असल्याचे म्हणाला. त्यांच्या या एका वाक्याने सर्व परिश्रमावर पाणी फिरले अशा शब्दात वंचितचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली.
वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची नवा मोंढा येथे प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी ते म्हणाले, बोफार्समध्ये राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली. परंतु त्यात काहीच निघाले नाही. आता राफेल खरेदीत लाच दिल्यावरुन फ्रेंच सरकारने दोन अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकले. परंतु लाच घेणारे हे भारतातीलच आहेत. ते कोण हे शोधा? परंतु यावेळी काँग्रेस फुसका बार निघाली. संघासोबत आमचं खानदानी भांडण आहे. जोपर्यंत संघ किंवा आम्ही आमची भूमिका बदलणार नाही तोपर्यंत मैत्री नाही. परंतु आता मोदी संघाचेही ऐकावयास तयार नाहीत. निवडणुक रोखे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी तंबी दिल्यानंतर बँकेने सर्व कागदपत्रे पुढे आणली. त्यात भाजप आणि कॉग्रेसलाही पैसा मिळाला आहे. ज्या ड्रग कंपन्याच्या औषधांमुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. त्या कंपन्यांना बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या कंपन्यांनी ३०० ते ४०० कोटी रुपयांचे रोखे घेवून ते भाजपाला दिले. त्यानंतर या कंपन्याचे ड्रग पुन्हा बाजारात आले. लोक मेले तरी चालतील पण पक्षाच्या तिजोरीत पैसे आले पाहिजेत अशी भाजपाची भूमिका आहे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगाविला.
एकाही गरीब मराठ्याला उमेदवारी नाही
काँग्रेस किंवा भाजप या पक्षांनी एकाही गरीब मराठ्याला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु असताना त्यावेळी या नेत्यांनी पाठींबा का दिला नाही? असा सवाल मराठा समाजाने विचारायला पाहिजे. सध्याची सत्ता ही निजामी मराठ्यांची आहे. ते उपेक्षितांना जवळ करण्यास तयार नाहीत असेही आंबेडकर म्हणाले.