कॉफी शॉपवर धाड, पाच जोडपे पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:29 AM2020-12-05T04:29:19+5:302020-12-05T04:29:19+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून या कॉफी शॉपमध्ये गैरप्रकार सुरू होते. या कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी ...
गेल्या अनेक दिवसांपासून या कॉफी शॉपमध्ये गैरप्रकार सुरू होते. या कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यावर धाडी मारून हे कॉफी शॉप बंद केले होते; परंतु काैठा भागात काही दिवसांपूर्वीच नव्याने कॉफी शॉप उघडण्यात आले. दोन शटरमध्ये असलेल्या या कॉफी शॉपमध्ये दोन फ्लोअर करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक राजू काळे यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांकडे केली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी पाच जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तेथे आढळून आले. त्यामध्ये पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीचाही समावेश होता. पोलिसांनी त्यांना पकडताच सोडण्यासाठी ते गयावया करीत होते. यावेळी पोलिसांनी कॉफी शॉप चालकाला ताब्यात घेतले होते. या कॉफी शॉपच्या शेजारीच आणखी एक शटर होते. त्यामध्येही तरुण-तरुणींना एकांत मिळावा या उद्देशाने खास व्यवस्था केली होती. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
चौकट- जोडपे आत, बाहेरून कुलूप
दुसऱ्या शटरमध्ये जोडप्यांना आत प्रवेश दिल्यानंतर बाहेरून कुलूप लावून शॉपचा मुलगा निघून जात होता. त्यानंतर दीड ते दोन तासाने फोन आल्यानंतर तो परत येऊन कुलूप उघडत होता. या ठिकाणी एका तासासाठी साधारणत: पाचशे ते सातशे रुपये आकारण्यात येत होते. यामध्ये अल्पवयीन तरुणींचाही समावेश होता.
चौकट-
कारवाई सुरू असतानाच जोडपे दाखल
पोलिसांकडून कॉफी शॉपवर कारवाई सुरू असतानाच एक जोडपे आले. साध्या वेशात असलेल्या पोलिसांनाच त्यांनी शॉप सुरू आहे काय, असे विचारले. पोलिसांनीही त्यांना सुरू आहे, या मध्ये असे म्हणून आतमध्ये घेतले. त्यानंतर या तरुणालाही ताब्यात घेण्यात आले. कॉफी शॉपमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रकार घडत होता. यामुळे आम्ही कारवाईसाठी पाठपुरावा करत होतो, असे नगरसेवक राजू काळे यांनी सांगितले.