भुयारी पूलाच्या कामासाठी औरंगाबादजवळ रेल्वेचा लाईन ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 03:58 PM2020-01-30T15:58:48+5:302020-01-30T15:59:28+5:30
शनिवार, रविवारच्या काही गाड्या अंशत: रद्द तर काही उशिराने धावणार
नांदेड : औरंगाबाद-चिकलठाणा सेक्शनमध्ये औरंगाबाद जवळील रेल्वेफाटक ५४ वर भुयारी पूलाच्या आरसीसी बॉक्स बसविण्याच्या कामासाठी शनिवारी १ फेब्रुवारी रोजी तीन तासांचा तर २ फेब्रुवारी रोजी चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द, काही अंशत: रद्द तर काही रेल्वे गाड्या उशिराने धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने कळविले आहे.
शनिवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी २.५० ते ५.५० या वेळेत १८० मिनीटांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे गाडी संख्या ५७५४९ हैदराबाद ते औरंगाबाद ही सवारी गाडी जालना पर्यंतच धावणार असून जालना ते औरंगाबाद दरम्यान ती रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या ५७५५० औरंगाबाद ते हैदराबाद ही सवारी गाडी औरंगाबाद ऐवजी जालना येथून सुटणार असून औरंगाबाद ते जालना दरम्यान ती रद्द असेल. गाडी संख्या ०७०६६ औरंगाबाद ते नांदेड ही विशेष गाडी तिच्या नियमीत सायंकाळी ५ वेळे ऐवजी ५५ मिनीटे उशिराने म्हणजेच ५.५५ मिनीटांनी सुटेल. गाडी संख्या १७६८७ मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस औरंगाबाद येथून सायंकाळी ६ ऐवजी १५ मिनीटे उशिराने म्हणजेच ६ वाजून १५ मिनीटांनी सुटेल.
रविवार २ फेबु्रवारी रोजी दुपारी २.५० ते ६.५० या वेळेत या मार्गावर २४० मिनीटांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी गाडीसंख्या ७७६९१ जालना ते नगरसोल डेमु पुर्णत: रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी संख्या ७७६८४ नगरसोल ते जालना ही गाडी पुर्णत: रद्द राहील. गाडी संख्या ५७५४९ हैदराबाद ते औरंगाबाद ही सवारी गाडी जालना पर्यंतच धावेल. जालना ते औरंगाबाद दरम्यान ती रद्द असेल. गाडी संख्या ५७५५० औरंगाबाद ते हैदराबाद ही सवारी गाडी औरंगाबाद ऐवजी जालना येथूनच सुटेल. औरंगाबाद ते जालना दरम्यान ती रद्द असेल. गाडी संख्या १७६८७ मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस औरंगाबाद येथून सायंकाळी ६ ऐवजी ६.१५ वाजता सुटेल. तर गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा ते मनमाड ही सवारी गाडी चिकलठाणा येथे ४० मिनीटे थांबेल.