नांदेड विभागात रेल्वे, बस हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:34 AM2018-09-19T00:34:31+5:302018-09-19T00:35:08+5:30
गौरी-गणपती सणासाठी गावी आलेले चाकरमाने परतीच्या मार्गावर असून नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्वच रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ दरम्यान, बहुतांश एक्स्प्रेस गाड्यांची वेटींग लिस्ट शंभरावर आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि वाहनधारकांनी आपले भाडे दुप्पट करीत प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गौरी-गणपती सणासाठी गावी आलेले चाकरमाने परतीच्या मार्गावर असून नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्वच रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ दरम्यान, बहुतांश एक्स्प्रेस गाड्यांची वेटींग लिस्ट शंभरावर आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि वाहनधारकांनी आपले भाडे दुप्पट करीत प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे़
शनिवारी गौरीचे आगमन आणि रविवारी मुख्य पूजा असा कार्यक्रम झाला़ या सणासाठी बहुतांश मंडळी आपल्या कुटुंबियासमवेत गावी येतात़ यामध्ये नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहणाºया नागरिकांसह विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे़ त्यात प्रामुख्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरांत राहणारे अधिक आहेत़ योगायोगाने गौरीचा सण हा शनिवार आणि रविवारी आल्याने गर्दीत भर पडली़
दरम्यान, शुक्रवार आणि शनिवारी नांदेडकडे येणाºया सर्वच गाड्या हाऊसफुल्ल होत्या़ अशीच परिस्थिती परतीच्या प्रवासासाठी सोमवार आणि मंगळवारी राहिली़ दरम्यान, आरक्षीत डब्बेदेखील प्रवाशांनी खच्चाखच्च भरल्याचे चित्र पहायला मिळत आहे़
नांदेडकडून मुंबई, पुण्याकडे धावणारी तपोवन, देवगिरी, पनवेल, नंदीग्राम आदी गाड्यांची वेटींग लिस्ट मागील चार दिवसांपासून शंभरावर आहे़ तर सचखंड एक्स्प्रेस पुढील तीन महिन्यांसाठी बुक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ सध्या मराठवाडा एक्स्प्रेस- ११८ वेटींग, नंदीग्राम १३२, तपोवन- ५६, देवगिरी - ७३, बंगळुरू- १४५, हैदराबाद-परभणी- १०५ वेटींग आहे़ अशीच स्थिती इतर गाड्यांची आहे़ गर्दीतही फेरीवाल्यांकडून रेल्वेत साहित्य विकले जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रास आणि अडचणीचा सामना करावा लागत आहे़
दरम्यान, रेल्वे आणि बसला उसळलेली प्रवाशांची गर्दी पाहून पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर या मार्गावर धावणाºया ट्रॅव्हल्सकंपन्यांनी तिकीट दर वाढविले आहेत़ पुण्यासाठी ५०० रूपयांऐवजी थेट दुप्पट १ हजार ते १२०० रूपये आकारले जात आहेत. दिवाळीप्रमाणचे महालक्ष्मी सणाला प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे़ दरम्यान, परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या विविध नियंमाना या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या केराची टोपली दाखवित आहेत़ तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोणातून बहुतांश ट्रॅव्हल्समध्ये कोणत्याच उपाययोजना नाहीत़ परंतु, याकडे संबंधित विभागाचे अधिकारीदेखील दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे़
पाळज गणपती दर्शनासाठी विशेष बस
भोकर तालुक्यातील पाळज येथील गणपती सर्वदूर प्रसिद्ध असून गणेशोत्सवादरम्यान पाळजला येणाºया भक्तांची गर्दी लक्षात घेवून नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीने पाळजसाठी विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे़ गणपती विसर्जनापर्यंत नांदेड, भोकर आदी ठिकाणावरून विशेष बसेस सोडल्या आहेत़ तर ज्या मार्गावर प्रवाशांची अधिक गर्दी आहे़ त्या मार्गावर वाढीव बस सोडण्याचे अधिकार आगार प्रमुखांना दिल्या आहेत़ परिस्थिती पाहून जादा गाड्या सोडण्यात येत आहे़ दरम्यान, नांदेड येथून परभणी, हिंगोली, लातूर आदी मार्गावर जादा बस चालविण्यात येत असल्याचे विभागप्रमुख अविनाश कचरे यांनी सांगितले़