आदिवासी वस्तीला जोडणारा रेल्वे अंडरब्रिज गैरसोयीचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:03+5:302021-01-04T04:16:03+5:30
तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारी शिवरामखेडा ही आदिवासीवस्ती आदिलाबाद मुदखेड मार्गावर अंबाडी रेल्वे स्टेशन नजीक रूळाला लागून असून येथून ...
तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारी शिवरामखेडा ही आदिवासीवस्ती आदिलाबाद मुदखेड मार्गावर अंबाडी रेल्वे स्टेशन नजीक रूळाला लागून असून येथून ये -जा करतांना रात्री अपरात्री रूळ ओलांडून जावे लागते. पूर्वी येथे रेल्वेगेट होते मात्र रेल्वे रुंदीकरणाच्या कामानंतर दोनशे मीटर अंतरावर अंडरब्रिज करण्यात आले. पावसाळ्यात या पुलाखाली पाणीच पाणी असते तर हिवाळा असो की उन्हाळा हा रस्ता बंदच असतो. आजही मोठे वाहन आदिवासी खेड्यात जात नाही त्यामुळे हा भुयारीपूल असून अडचण नसून खोळंबाच आहे. पूर्वीच्या पण बंद करण्यात आलेल्या गेटजवळ वाहने उभी करावी लागत आहे आणि मगच तेथून पायी मार्गक्रमण करावे लागत आहे. शिवरामखेडा वासीयांसाठी असलेले रेल्वेचे अंडरब्रिज आजही गैरसोयीचे आहे. खुद्द जिल्हाधिकारी व त्यांच्या फौजफाट्यातील अधिकाऱ्यांना पूर्वीच्या बंद रेल्वेगेटजवळ वाहने उभी करून पायी चालत जावे लागले. या आदिवासी वस्तीत आजपर्यंत कित्येक आयएएस दर्जाचे अधिकारी आले पण या गैरसोयीच्या भुयारी पुलाचा प्रश्न काही सुटला नाही. वस्तीत कोणतेही बांधकाम हाती घेतले तर त्यासाठी लागणारे साहित्य पूर्वीच्या बंद रेल्वे गेटजवळ उतरावे लागते आणि तेथून नंतर डोक्याने वाहतूक करावी लागते त्यामुळे मोठ्या खर्चाची झळ सहन करावी लागत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवरामखेडा या आदिवासी वस्तीला भेट दिली, यावेळी सरपंच प्रेमसिंग जाधव, माजी सरपंच किशन राठोड, आदिवासी कार्यकर्ते गुलाब मडावी,विजय मडावी आदींनी या गैरसोयीच्या रेल्वे भुयारी पुलाचा प्रश्न सोडवा अशी मागणी केली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही इटनकर यांनी दिली.