पर्जन्यमापकांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:03 AM2019-05-26T00:03:34+5:302019-05-26T00:10:35+5:30

पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

Rain checkers will be done | पर्जन्यमापकांची होणार तपासणी

पर्जन्यमापकांची होणार तपासणी

Next
ठळक मुद्देपथकाची स्थापना पावसाची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी प्रशासनाची खबरदारी

अनुराग पोवळे ।
नांदेड : पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. यासाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महसूल मंडळात असलेले सर्व पर्जन्यमापक यंत्र जागतिक हवामान निकषाप्रमाणे आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. जी यंत्रे सुुस्थितीत अथवा नादुरुस्त आहेत ती दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गठीत करण्यात आले आहे.
या पथकाकडून पर्जन्यमापक यंत्राची देखभाल, पावसाची मोजमाप, त्याची योग्य पद्धत, संभाव्य चुका आदींबाबतची माहिती संबंधित पर्जन्य मोजणा-या कर्मचा-याला देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. भारतीय हवामान खात्याचे मॅट्रॉलॉजिस्ट ए.एम. पांडे, नांदेडचे हवामान निरीक्षक बी.एम. कच्छवे यांचा या पथकात समावेश आहे. या पथकाला मोजणीसाठी वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार मुखेड तालुक्यातील महसूल मंडळातील पर्जन्यमापकाची २७ मे रोजी तपासणी केली जाणार आहे. तर बिलोली व धर्माबाद तालुक्यात २८ मे, नांदेड व मुदखेड तालुक्यात २९ मे, नायगाव व देगलूर तालुक्यात ३० मे, हदगाव व माहूर तालुक्यात ३१ मे, किनवट तालुक्यात १ जून, हिमायतनगर व उमरी तालुक्यात ३ जून, अर्धापूर आणि भोकर तालुक्यात ४ जून आणि सर्वात शेवटी लोहा व कंधार तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्राची तपासणी ५ जून रोजी केली जाणार आहे. भारतीय हवामान विभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकात अव्वल कारकून सुरेश पेदेवाड, लिपिक शंकर मगडेवार आणि विजय येमेकर यांचाही समावेश आहे.
या तपासणी पथकाला तालुक्यांमध्ये सर्व पर्जन्यमापक यंत्र दाखवावेत. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. या तपासणीचा अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
चुकीच्या नोंदी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या
पर्जन्यमापकावरील चुकीच्या नोंदीमुळे अनेक ठिकाणी तक्रारी होत आहेत. पावसाच्या चुकीच्या नोंदी घेतल्या जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक भागात प्रशासकीय अधिका-यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत तर हा विषय ऐरणीवर येत असतो. परिणामी प्रारंभीपासूनच या विषयात लक्ष घालणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पावसाळ्यापूर्वीच ही तपासणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही पावसाची नोंद घेणारे पर्जन्यमापक यंत्र महत्त्वाचे असल्याने या यंत्राची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Rain checkers will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.