धर्माबाद तालुक्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:28 AM2021-05-05T04:28:50+5:302021-05-05T04:28:50+5:30

मास्क व सॅनिटायझरचे वाटप मुक्रमाबाद - येथील पोलीस व ॲडव्होकेट कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याकामी भाजपचे ...

Rain in Dharmabad taluka | धर्माबाद तालुक्यात पाऊस

धर्माबाद तालुक्यात पाऊस

Next

मास्क व सॅनिटायझरचे वाटप

मुक्रमाबाद - येथील पोलीस व ॲडव्होकेट कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याकामी भाजपचे तालुका चिटणीस हेमंत खंकरे यांनी पुढाकार घेतला. यावेळी जलालोद्दीन सय्यद, अशोक सुनेवाड, दादाराव गुमडे, जलील पठाण, अशोक लोणेकर, देवीदास राठोड, गणेश राठोड, शशिकांत नवाडे, अमीत कचंडे, पृथ्वीराज गुमडे आदी उपस्थित होते.

तुकडोजी महाराज जयंती

नायगाव - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मांजरम येथे गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने साजरी करण्यात आली. नागरिकांनी ग्रामगीता वाचावी व महाराजांचे भजन गावे, ऐकावे. यामुळे ऊर्जास्त्रोत निर्माण होऊन कोरोनाचे भय कमी होईल, असे ग्रामसेवेचे अधिकारी साहेबराव जाधव यांनी यावेळी सांगितले.

जनाबाई सांगळे यांना पदोन्नती

देगलूर - येथील पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे यांना सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. यापूर्वी त्या उदगीर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. देगलूर तालुक्यातील शहापूर दूरक्षेत्रची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

विजेच्या धक्क्याने मृत्यू

अर्धापूर - तालुक्यातील बामणी येथील विजय मोतेवार (वय ३६) यांचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ३ मे रोजी घडली. घरावर बांधलेल्या तणाव्यात वीज उतरून ही घटना घडल्याचे पाेलिसांनी सांगितले. अर्धापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. तपास जमादार इश्वर लांडगे करीत आहेत.

अन्नधान्याच्या कीटचे वाटप

किनवट - येथील श्री साईबाबा संस्थानच्यावतीने शहरातील १०१ गरजू कुटुंबांना अन्नधान्यच्या कीटचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी ५ किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक किलो साखर, एक किलो मीठ, चहापत्ती, मिरचीमसाला अशा कीटचे वाटप करण्यात आले.

अर्बन बँकेच्यावतीने मास्कचे वाटप

नरसी - बुलडाणा अर्बन बँकेच्यावतीने रामतीर्थ पोलीस ठाण्यात नरसी पोलीस चौकी तसेच पत्रकारांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक शशिकांत शेटे, सहायक शाखा व्यवस्थापक गणेश छपरे, नामदेव मुरशेटवाड, प्रभाकर खानसोळे, बालाजी डुकरे, भाऊराव डोंगरे, एपीआय माधव पुरी, राजेश पाटील, गंगाधर वडगावे, गंगाधर भिलवंडे, सुभाष पेरकेवार, दिलीप वाघमारे, कैलास तेलंग, आनंदा सूर्यवंशी, गंगाधर गंगासागरे, शेषराव कंधारे, लक्ष्मण बरगे, सय्यद जाफर, शामराव मुंडे, इब्राहीम पटेल आदी उपस्थित होते.

पिंपरफोडीत फवारणी

बोधडी - कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यामुळे पिपंरफोडी येथे ग्रामपंचायतीच्यावतीने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. याकामी ग्रामसेवक तुपेकर, सरपंच अनुसयाबाई डाके यांनी पुढाकार घेतला. कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन ग्रामसेवक तुपेकर यांनी केले आहे.

भाजीपाल्याला कवडीमोल दर

बामणीफाटा - परिसरातील सर्व बाजारपेठ बंद असल्याने व्यापारी खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे भाजीपाला कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे व्यवसायातील नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. लावलेला खर्चही निघेल की नाही, याची शंका आहे, अशी माहिती शेतकरी राजू मिश्रा यांनी दिली.

खा. हेमंत पाटील यांना निवेदन

हिमायतनगर - तालुक्यातील दुधड, वाळकेवाडी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या समस्या सोडवण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन खा. हेमंत पाटील यांना देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी नियुक्त करावेत, धनवेवाडी, वडाचीवाडी येथील नागरिकांना पक्का रस्ता द्यावा, वडाचीवाडी येथील ध्यान केंद्रासाठी निधी द्यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

उघडी रोहित्रे धोकादायक

हदगाव - तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या रोहित्रांचे दरवाजे गायब आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीतून होत आहे. त्यामुळे त्यापासून मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

सर्रासपणे वृक्षतोड

मांडवी - वनविभागाच्यावतीने वृक्ष न तोडण्याबाबत जनजागृती होत नसून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे मांडवी व परिसरातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. तोडलेले वृक्ष ट्रॅक्टरने वाहतूक करून नेले जात आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

एटीएममध्ये खडखडाट

मुखेड - शहरातील बहुतांश बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने खडखडाट झाला आहे. एक ते दोन दिवसाआड येत असलेल्या शासकीय सुट्यांमुळे एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आधीच बँकेचे दैनंदिन कामकाज केवळ शासकीय कामासाठी सुरू आहे.

फूल उत्पादकांना फटका

मुदखेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मुदखेड शहरासह तालुक्यात फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारपेठेअभावी फुले जागेवरच सुकून जात आहेत. त्यामुळे फूल उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

देगलूरच्या बाजारपेठेत गर्दी

देगलूर- जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोमवारी शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

नांदेड आगाराला फटका

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे नांदेड आगारातील अनेक बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे महिन्याभरात मोठे नुकसान नांदेड आगाराला सोसावे लागत आहे. राज्य शासनाने नियम व अटींचे पालन करून बससेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

व्यावसायिकांवर उपासमार

नायगाव - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दीड महिन्यापासून संचारबंदी घोषित केली. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे रद्द करावे लागले. त्यामुळे कमाईचे चार महिने हातचे गेल्याने वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने या व्यावसायिकांना तातडीने मदत करण्याची गरज आहे.

Web Title: Rain in Dharmabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.