पाऊस थांबला ! नांदेड जिल्ह्यावर भीषण जलसंकटाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 06:51 PM2019-08-19T18:51:42+5:302019-08-19T18:54:13+5:30
जिल्ह्यात केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक
नांदेड : जिल्ह्यात असलेल्या १११ जलप्रकल्पांत केवळ २५.९३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यात दोन मोठ्या असलेल्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात २१.४१ टक्के तर मानार प्रकल्पात २३.४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर जलसंकट घोंघावत असून या संकटावर कशी मात करायची? याची चिंता प्रशासनाला लागली आहे.
जिल्ह्यात १११ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठे प्रकल्प, ९ मध्यम प्रकल्प, आठ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पांची क्षमता ८०४.६२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पण प्रत्यक्षात आजघडीला या प्रकल्पामध्ये केवळ १८७.९१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ८८ लघुप्रकल्पात ५८.३६ दलघमी, आठ उच्च पातळी बंधाऱ्यात ४९.४३ दलघी जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेले ४ कोल्हापुरी बंधारे कोरडेठाकच आहेत.
मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी ३५.७६ टक्के इतकी होती. त्यामध्ये सर्वाधिक जलसाठा विष्णूपुरी प्रकल्पात ६६.३ दलघमी इतका होता. मानार प्रकल्पात गतवर्षी १५.५७ दलघमी जलसाठा शिल्लक होता. यावर्षी मात्र तो दुप्पट आहे. मानार प्रकल्प यंदा ३१.८५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. नांदेड शहरात तर आजघडीला आठ दिवसांआड पाणी पुरवठा सुरू आहे. मे अखेरपासूनच नांदेड शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, नांदेड शहरासाठी पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडेच आहेत. जायकवाडी वगळता येलदरी, सिद्धेश्वर, दुधना आदी प्रकल्प कोरडे असल्याने पाणी आणायचे तरी कोठून? हा प्रश्न उद्भवला आहे.
जायकवाडी प्रकल्प ९५ टक्के भरला असला तरीही या प्रकल्पातून नांदेडसाठी पाणी आणण्यासाठी अद्याप तरी कोणताही निर्णय झाला नाही. जायकवाडीहून पाणी आणायचा निर्णय घेतला तरीही ही बाब मोठी जिकिरीची ठरणार आहे. गोदावरी पात्रासह तब्बल १२ बंधारे कोरडे आहेत. त्यामुळे जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
जिल्ह्यात आजघडीला सरासरीच्या ४९.२० टक्के पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ६० टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात झाला आहे.
नांदेड तालुक्यात ४७.५०, अर्धापूर- ४६.६१, भोकर- ४९.२, उमरी- ४६.९८, कंधार- ५३.०८, लोहा- ४४.६९, किनवट तालुक्यात ५२.२९, माहूर- ५१.१६, हदगाव- ४६.२८, हिमायतनगर- ५३.४१, देगलूर- ३६.५१, बिलोली- ५३.१६, धर्माबाद- ५०.४९, नायगाव- ४९.२८ आणि मुखेड तालुक्यात केवळ ४५.८९ टक्के पाऊस झाला आहे.
सांगवी बंधाऱ्यातून पाण्याचा अपव्यय
नांदेड शहरातील लोकप्रतिनिधीही या बाबतीत मूग गिळूनच बसले आहेत. विष्णूपुरी प्रकल्पात केवळ १७.३० दलघमी पाणी शिल्लक आहे. या जलसाठ्यातून दोन महिने तहान भागवली जावू शकते. पण त्याचवेळी जायकवाडी ९५ टक्के भरलेले असताना हे पाणी नांदेडसाठी मिळावे यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नांदेड शहराच्या लोकप्रतिनिधींनीही अद्याप कोणतेही प्रयत्न केले नाहीत. परिणामी नांदेडकरांना आजही आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे. विष्णूपुरी प्रकल्प कोरडा असला तरीही शहरासाठी असलेल्या पर्यायी पाणीपुरवठा योजनेच्या सांगवी बंधाऱ्यातून मात्र पाणी वाया जात आहे. याकडे महापालिका दुर्लक्षच करीत आहे.