नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विष्णुपुरीचे सहा दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:43+5:302021-07-23T04:12:43+5:30
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वदूर असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. परिणामी ...
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वदूर असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. परिणामी शेतीशी संबंधित सर्व कामे खोळंबली असून सततच्या पावसामुळे पिकांचेही नुकसान होत आहे. उमरी तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, पैनगंगेला पूर आल्यामुळे शेकडो हेक्टर शेतांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील माहूर, किनवट, हदगाव, कंधार, देगलूर, आदी तालुक्यांत पावसाने मोठे नुकसान केले आहे.
चाैकट ............
पुरात अडकलेल्या ४० लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले
फुलवळ : कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी येथील पूल वाहून गेल्याने काही वाड्या-तांड्यांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, या पुरामध्ये अडकलेल्या ४० जणांची सुखरूप सुटका करण्यात आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.
कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कलमधील भोजूचीवाडी, मानसिंगवाडी, लिंबातांडा, चोळीतांडा या वाडी-तांड्याला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अतिपावसाच्या पाण्यामुळे खरडून गेल्यामुळे रहदारीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुलाअभावी बुधवारी सायंकाळपासून शेतकरी, विद्यार्थी व रुग्ण यांचा सपर्क तुटल्यामुळे शेतातील आखाड्यावर रात्र काढावी लागली. जवळपास ४० लोक अडकून पडले होते. त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचविले असल्याचे सरपंच प्रतिनिधी सतीश देवकते यांनी सांगितले. दरम्यान, या रस्त्यावरील पुलाची पाहणी पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण, सतीश देवकते यांनी केली.