राज ठाकरेंच्या सभेने काँग्रेसला बळकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:15 AM2019-04-13T00:15:26+5:302019-04-13T00:17:22+5:30
पाच वर्षानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेल्या राज ठाकरे यांनी नांदेड मतदारसंघात भाजपाच्या अडचणी आणखीणच वाढविल्या आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या भाषणाचे पाच व्हिडीओही सादर केले.
विशाल सोनटक्के।
नांदेड : पाच वर्षानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेल्या राज ठाकरे यांनी नांदेड मतदारसंघात भाजपाच्या अडचणी आणखीणच वाढविल्या आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या भाषणाचे पाच व्हिडीओही सादर केले. सभेला लोटलेला जनजागर आणि या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर केलेल्या घणाघाती टीकेमुळे ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेसला बळकटी मिळाली आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण, भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यात सामना रंगला आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी प्रचाराच्या अनुषंगाने जिल्हा पिंजून काढला आहे. त्यातच १५ एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जंगी सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मनसेच्या वतीने झालेली राज ठाकरे यांची सभाही काँग्रेससाठी ‘बोनस’ ठरणार आहे.
सभेच्या प्रारंभीच राज ठाकरे यांनी माझा पक्ष या निवडणुकीत उभा नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात कोणीतरी बोलले पाहिजे. वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे, त्यासाठीच ही सभा घेत असल्याचे सांगितले. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले. महाराष्टÑ तसेच देशाने मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपाकडे सत्ता सोपविली. मात्र निवडणुका संपल्यानंतर हा माणूस वेगळाच असल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षांत या सरकारने तमाम महाराष्ट्रवासियांची घोर फसवणूक केल्याचे सांगत, राज ठाकरे यांनी मंचावर उभारलेल्या दोन स्क्रिनवर मोदींचे व्हिडीओ सादर केले. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या प्रत्येक वक्तव्यानंतर उपस्थित जनसमुदायातून भाजपाविरोधात अत्यंत तीव्र शब्दात घोषणाबाजी होत होती. सभेला लाभलेला तुडुंब प्रतिसाद आणि राज ठाकरे यांनी सभेच्या माध्यमातून भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात प्रश्नांची मालिकाच उपस्थित केली. राज ठाकरे यांच्या सभेतील ही वक्तव्ये तसेच त्यांचे व्हिडीओही रात्रीपासूनच सोशल मीडियावर व्हॉयरल झाल्याने अगोदरच अडचणीत असलेल्या भाजपाची राज ठाकरेंच्या या सभेने आणखीनच कोंडी केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणात भाजपाच्या प्रचारातील मुद्दे निशाण्यावर राहिले. त्यामुळे प्रचाराच्या उर्वरित दिवसांत भाजपा उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचाही हे प्रश्न पिच्छा सोडणार नसल्याने ते कसे उत्तर देतात, हे पहावे लागेल.