राजर्षी म्हणजे राजातला ऋषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:08 AM2018-11-04T01:08:32+5:302018-11-04T01:10:09+5:30
अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यातून बहुजन समाजाला बाहेर काढणे हे शाहू महाराजांच्या कार्याचे सूत्र होते. आज संसदेच्या प्रांगणात फक्त एकाच राजाचा पुतळा उभा आहे. कारण राजर्षी शाहू महाराज हे राजातले ऋषी होते. धर्माने निर्माण केलेल्या लोखंडी श्रृखंला तोडण्याचे काम करीत त्यांनी माणूस निर्माण करण्याचे संस्कार आपल्याला दिल्याचे इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.
नांदेड : अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यातून बहुजन समाजाला बाहेर काढणे हे शाहू महाराजांच्या कार्याचे सूत्र होते. आज संसदेच्या प्रांगणात फक्त एकाच राजाचा पुतळा उभा आहे. कारण राजर्षी शाहू महाराज हे राजातले ऋषी होते. धर्माने निर्माण केलेल्या लोखंडी श्रृखंला तोडण्याचे काम करीत त्यांनी माणूस निर्माण करण्याचे संस्कार आपल्याला दिल्याचे इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.
येथील सत्यशोधक विचार मंचच्या वतीने शहरातील कुसुम सभागृहात आयोजित ‘बहुजनोद्धारक राजर्षी शाहू महाराज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. मंचावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आ. डी.पी. सावंत, आ. सतेज पाटील, आ. अमित झनक, महापौर शीलाताई भवरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत होते.
व्याख्यानाच्या प्रारंभीच जयसिंगराव पवार यांनी नांदेडकरांनी पुतळा उभारण्याची व्यक्त केलेली इच्छा पूर्णत्वास नेल्याबाबत खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. डी.पी. सावंत यांना धन्यवाद दिले. अशोकरावांच्या मदतीमुळेच छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र इतर भाषेत आणता आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. बहुजन समाज म्हणजे नेमके कोण? आणि त्याच्या उद्धाराची सूत्रे कोणती? याची माहिती पवार यांनी व्याख्यानाद्वारे दिली. आज काही ठिकाणी बहुजन समाज म्हणजे केवळ मराठा अशी मांडणी केली जात आहे. वस्तुत: राजर्षी शाहू महाराज यांच्यासह शिंदे यांनी त्या काळात बहुजनाची व्याख्या सांगितली आहे. विद्या, सत्ता आणि मत्ता यापासून वंचित ते बहुजन असे सांगत हीच व्याख्या आजही लागू करायला हवी, असे ते म्हणाले. याच सूत्रावरुन मागासलेले कोण? हे ठरविले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांसह महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाचा उद्धार केल्याचे सांगितले जाते. म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला या महापुरुषांनी गर्तेतून बाहेर काढले. अज्ञान म्हणजे केवळ लिहिता, वाचता न येणे एवढेच नव्हे तर आपण कोण आहोत? हेही जर समजत नसेल तर त्यासारखे अज्ञान नव्हे, असे ते म्हणाले. बहुजन उद्धाराचे पहिले सूत्र शिक्षण असल्याचे सांगत शिक्षणातच मनुष्यत्व निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच १९१७ मध्ये शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. विशेष म्हणजे, त्यावेळी मिळणाऱ्या १५ ते २० लाख महसुलापैकी १ लाख शिक्षणावर खर्च केले जात होते. तेव्हाचे एक लाख म्हणजेच आजचे २५० कोटी रुपये असल्याचे सांगत, शिक्षणाबरोबरच सिंचनावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. राधानगरीसारख्या धरण उभारणीवर दरवर्षी लाखभर रुपये खर्च केले जात असत. शाहू महाराज यांच्यात भविष्याचा वेध घेण्याची क्षमता होती. जाती निर्मूलनासाठीचे त्यांचे कार्य सर्वश्रुत आहे. माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची पहिली परिषद घेतली. या परिषदेमागेही शाहू महाराजच उभे होते. त्यांनीच तेव्हाच्या बहिष्कृत जनतेला जावून तुमच्यातला माणूस एवढा मोठा झालाय, त्यांना बोलवा असे सांगितले. आणि महाराजही स्वत:हून डॉ. आंबेडकरांना भेटायला गेले. या परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांकडे पहात हा तरुण उद्याचा तुमचा नेता असल्याचे सांगितले होते. याची आठवणही डॉ. पवार यांनी करुन दिली. सूत्रसंचालन भीमराव हटकर तर प्रास्ताविक कोंडदेव हटकर यांनी केले. यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष जयश्री पावडे, जयश्री डोंगरे, रामचंद्र वनंजे, श्रावण नरवाडे, राम वाघमारे, संजय जाधव आदींसह सत्यशोधक विचारमंचचे सदस्य उपस्थित होते.
... तर देशाचे भाग्य बदलले असते
राजर्षी शाहू महाराज यांना स्वत:लाही राजा असूनही केवळ जातीमुळे तुच्छतेला सामोरे जावे लागले होते. छत्रपती शिवाजी राजांचे वंशज असताना हीन वागणूक, मग बहिष्कृत समाजाला कशा पद्धतीने वागविले जात असेल या भावनेतूनच ते या बहिष्कृत समाजाच्या उद्धाराकडे वळले. शाहू महाराजांकडे १०० वर्षे काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी होती. शिक्षणावर त्यांनी भर दिला. राधानगरीसारखे त्यावेळचे देशातील सगळ्यात मोठे धरण उभारले. अशा महापुरुषाला दिल्लीचे तख्त मिळाले असते तर आज देशाचे भाग्य बदललेले दिसले असते.
राजवाड्यातही केली कायद्याची अंमलबजावणी
राजर्षी शाहू महाराज यांनी तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात जावून परिवर्तनाला गती दिली. व्यवस्था बदलासाठी त्यांनी नवनवे कायदे केले. केवळ कायदे करुन ते थांबले नाहीत तर अगदी राजवाड्यातही त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली. अस्पृश्यांना धर्माच्या रुढी-परंपरेने जे व्यवसाय बंद केले होते तेच व्यवसाय राजर्षी शाहू महाराजांनी खुले करुन दिले. विशेष म्हणजे, त्या व्यवसायात त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून स्वत: रोेटी व्यवहार सुरू केला. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाशिवाय सामाजिक न्याय निर्माण होऊ शकत नाही, याची जाणीव त्यांना होती.