राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे महिनाभरात अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:56 AM2018-10-07T00:56:01+5:302018-10-07T00:56:47+5:30

शहरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर शिलाताई भवरे यांनी दिली.

Rajarshi Shahu's statue unveiled in the month | राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे महिनाभरात अनावरण

राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे महिनाभरात अनावरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर शिलाताई भवरे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळा उभारणीचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची परिपूर्ती एक वर्षाच्या आत होत आहे. या पुतळा उभारणीसाठी माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पालकमंत्री आ.डी.पी.सावंत यांच्या प्रयत्नांतून २०१३ मध्ये कृषी विद्यापीठाच्या जागेचे हस्तांतरण महानगरपालिकेकडे करण्यात आले. त्यानंतर २०१४ मध्ये या पुतळ्याच्या भूमिपुजन झाले. मागील २० ते २५ वर्षांपासून जिल्ह्यातील विविध समाजांंची या पुतळ्याविषयीची मागणी होती.
पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. याबाबतीत काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान आ.डी.पी.सावंत यांनी कोल्हापूर येथे माजी मंत्री आ.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्याविषयी चर्चाही केली आहे.
सध्या या पुतळ्याचे व परिसर सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील एक महिन्याच्या आत हा सोहळा होणार असल्याचे महापौर शिलाताई भवरे यांनी येथे सांगितले.
दरम्यान, शहरात होणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राजकीय मंडळींना बोलावू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. याबाबत शनिवारी निवेदन देण्यात आले. महापालिका प्रशासनाकडून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. मात्र समाजव्यवस्थेत मानवता रुजवण्यासाठी अस्पृश्यता नष्ट करुन बहुजनांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारे व्यक्तीमत्व म्हणून राजर्षी शाहूंचे इतिहासात स्थान आहे. बहुजनांची अस्मिता राजर्षी शाहू महाराज आहे. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांचे वंशज छत्रपती खा. संभाजीराजे भोसले किंवा इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ.आ. ह. साळुंके, प्रा. मा.म. देशमुख, प्रा.डा. अशोक राणा आदी विचारवंताच्या हस्ते करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, संकेत पाटील, भगवान कदम, श्याम पाटील कुशावाडीकर, गजानन इंगोले, कैलास वैद्य, मोहन शिंदे, बाळू भोसले, संगमेश्वर लांडगे, बाळासाहेब देसाई, संभाजी क्षीरसागर, सुरज पाटील, सुभाष कोल्हे, संजय कदम, परमेश्वर पाटील, शशीकांत गाडे, श्रीनाथ गिरी आदींनी केले आहे.
लवकरच शिष्टमंडळ जाणार
महापालिकेतर्फे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना रितसर निमंत्रण देण्यासाठी माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कोल्हापूर येथे लवकरच जाणार असून त्यांना पुतळा अनावरणासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी दिलेल्या वेळेनुसार लवकरच हा अनावरणाचा सोहळा संपन्न होईल, त्यानंतर छत्रपती शाहु महाराज यांचा पुतळा सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे.

Web Title: Rajarshi Shahu's statue unveiled in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.