बीओटीवरून नांदेड महापालिकेत रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:39 AM2018-11-30T00:39:18+5:302018-11-30T00:40:12+5:30
शहरातील वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा ठराव महापालिकेच्या शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
नांदेड : शहरातील वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा ठराव महापालिकेच्या शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. याच बीओटी विषयावरुन महापालिकेत रणकंदन सुरू झाले असून स्थायी समिती व महापालिका प्रशासन समोरासमोर आले आहेत.
वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा ठराव २७ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असता त्यामध्ये १४ नोव्हेंबर २०१८ रोजी पात्र ठरलेल्या ४ कंत्राटदारांचे प्रिमिअर दर उघडण्यात आले. त्यात विश्वकर्मा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.ने ३ कोटी २१ लाख, शारदा कन्स्ट्रक्शनने ३ कोटी ४५ लाख, सन्मान बिल्डकॉन प्रा.लि.ने ३ कोटी ५१ लाख आणि राज डेव्हलपर्सने सर्वाधिक ५ कोटी १ लाखांचा प्रिमिअर यांचा आहे. या कामासाठी महापालिकेने ३ कोटी ४७ लाखांचा प्रिमिअर अपेक्षित ठेवला होता. अपेक्षेपेक्षा ४४ टक्के जादा दराचे प्रिमिअम राज डेव्हलपर्सने देण्याची तयारी दर्शविली आहे.
ही निविदा प्रक्रिया मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवताच येत नाही, असा दावा स्थायी समितीने केला आहे. स्थायी समितीच्या अधिकारातील विषय सर्वसाधारण सभेकडे पाठवून स्थायी समितीच्या अधिकारावर गंडांतर आणले जात आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे न ठेवता योग्य त्या सुधारणा करुन तो स्थायी समितीच्यापुढे मान्यतेसाठी ठेवावा, असा ठराव स्थायी समितीने घेतला होता. मात्र शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेपुढे बीओटी प्रस्तावाला मान्यता देण्याचा ठराव ठेवण्यात आला आहे.
स्थायी समिती आणि प्रशासनातील हा वाद सुरु असताना काँग्रेसचे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी बीओटी प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारीच स्थायी समितीची सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे तर सर्वसाधारण सभा दुपारी ३ वाजता होणार आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत दलित वस्ती कामांना मान्यता देण्याचे सहा विषय ठेवण्यात आले आहेत. ज्यादा दराने हे प्रस्ताव आले आहेत. त्याचवेळी बीओटी मान्यता देण्याच्या संदर्भात प्रशासनाने स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर न करता सर्वसाधारण सभेपुढे ठेवल्याच्या विषयावरही वादळी चर्चा अपेक्षित आहे. सत्ताधारी आणि स्थायी समिती सदस्य सर्वसाधारण सभेत बीओटीच्या विषयावर काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थायी समितीवर होणार आठ सदस्यांची निवड
स्थायी समितीचे आठ सदस्य एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे निवृत्त झाल्या आहेत. १६ पैकी ८ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त झाले. रिक्त झालेल्या आठ जागांवर सदस्य निवड शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. ही स्थायी समितीवर कोणते आठ सदस्य जातील याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे आठ सदस्य स्थायी समितीवर नव्याने जाणार आहेत. अंतिम नावे शुक्रवारच्या सभेत घोषित करण्यात येतील.