अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 19:02 IST2020-06-17T18:59:45+5:302020-06-17T19:02:18+5:30
सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर घराशेजारील संतोष घोगरे (१९) याने अत्याचार केल्याची घटना २ एप्रिल २०१८ रोजी घडली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
मुखेड (जि. नांदेड) : मुखेड शहरातील सहावर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना २०१८ मध्ये एप्रिल महिन्यात घडली होती. याप्रकरणी मुखेडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.
मुखेड शहरातील गायत्री गल्लीतील सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर घराशेजारील संतोष घोगरे (१९) याने अत्याचार केल्याची घटना २ एप्रिल २०१८ रोजी घडली होती. पीडीत मुलगी दुपारी टी.व्ही. पाहण्यास घरी गेली असता संतोष घोगरे याने सदर अल्पवयीन मुलीला आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी या घटनेबाबत मुखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन संतोष घोगरे या आरोपीच्या विरोधात मुखेड पोलीस ठाण्यात पोस्कोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरिक्षक कविता जाधव यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष व वैद्यकीय पुराव्याआधारे न्यायालयाने आरोपीस वीस वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. महेश कागणे यांनी बाजू मांडली आहे. पोलीस अधिकारी डी. के. कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले.