आईच्या गळ्याला चाकू लावून चिमुरडीवर अत्याचार; दोघांना २० वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:55 PM2019-08-02T13:55:21+5:302019-08-02T14:03:46+5:30
सबळ पुराव्याअभावी एका आरोपीची निर्दोष सुटका
नांदेड : उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून घरात घुसलेल्या आरोपींनी तिच्या आईच्या गळ्याला चाकू लावला होता़ त्यानंतर चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केला होता़ या प्रकरणात भोकरचे न्या़ एम़एस़शेख यांनी दोन्ही आरोपींना २० वर्षाची शिक्षा सुनावली़
२६ नोव्हेंबर २०१८ रोजी उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात पिडीत मुलगी व तिची आई घरात असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास आनंदा महादू सावंत, कुणाल उर्फ खंडू पांडूरंग गायकवाड व शुभम देशमुख यांनी चिमुकलीवर बलात्कार केला़ यावेळी तिच्या आईच्या गळ्याला चाकू लावण्यात आला होता़ याप्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता़ तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. साक्षीदारांच्या साक्षीवरुन न्या़ एम़ एस़ शेख यांनी आनंदा महादू सावंत व कुणाल उर्फ खंडू पांडूरंग गायकवाड या दोघांना २० वर्ष सक्तमजूरी आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़
एक आरोपी सुटला
या खटल्यात सबळ पुराव्याअभावी शुभम देशमुख या आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली़ सरकार पक्षाच्या वतीने अॅड़ रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली़ या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक अभय देशपांडे व सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केला होता़