रेशनचा माल काळ्याबाजारात; मुक्रमाबादचा ‘तो’ गोदामपाल निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:29 PM2020-09-07T14:29:33+5:302020-09-07T14:35:09+5:30
या धान्य घोटाळ्याचे महसूल विभागाकडूनही स्वतंत्ररीत्या चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नांदेड : स्वस्त धान्य दुकानात पोहोचविण्यासाठीचे धान्य खुल्या बाजारात नेत असताना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर महसूल विभागाने आता मुक्रमाबादच्या गोदामाच्या गोदामपाल रूपेश मुधळकरला रविवारी निलंबित केले आहे. या धान्य घोटाळ्यासोबत महसूल विभागाकडूनही स्वतंत्ररीत्या चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद ते उदगीर रस्त्यावरील रावणकोळा येथे २ टेंपोमधून शासकीय धान्याची वाहतूक सुरू होती. हे टेम्पो स्वस्त धान्य दुकानाकडे न जाता थेट खुल्या बाजाराकडे जात होते. स्थानिक गुन्हा शाखेने ३१ आॅगस्ट रोजी एम.एच.२६/ एडी ८९६ आणि एम.एच.ए. ०४- सीपी- १५५९ क्रमांकाचे हे टेंपो अडवून त्यांची चौकशी केली. त्यात स्वस्त धान्य दुकानात वाटप करावयाचे धान्य होते. त्यामध्ये ६० क्विंटल गहू आणि ५० क्विंटल तांदूळ होता. तो जप्त करुन टेंपोचालकासह मुक्रमाबाद शासकीय गोदामाचा गोदामपाल मुधळकर आणि वाहतूक ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात धान्य घोटाळ्याची मालिका सुरूच आहे. वाहतूक ठेकेदारावर मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
गोदामपाल फरार
एकीकडे पोलीस चौकशी सुरू असताना महसूल विभागाने पहिल्या टप्प्यात शासकीय गोदामाचा गोदामपाल रूपेश मुधळकरवर निलंबनाची कारवाई केली आहे. मुधळकर हा सध्या फरार आहे. या प्रकरणाची चौकशी देगलूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याकडे सोपवली आहे. प्रत्यक्षात ही चौकशी आवश्यक ती कागदपत्रे न मिळाल्याने सुरू झाली नाही.