जिल्ह्यात दोन दिवसांत ३ हजार ३०० रेमडेसिविर प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:38+5:302021-05-10T04:17:38+5:30
जिल्ह्यासाठी शनिवारी १ हजार १०४ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले, तर रविवारी आणखी दोन हजार २०३ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले ...
जिल्ह्यासाठी शनिवारी १ हजार १०४ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले, तर रविवारी आणखी दोन हजार २०३ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. हे इंजेक्शन जिल्ह्यातील रुग्णालयांना वाटप करण्यात आले आहेत. कोविड रुग्णालयांसाठी पाठविलेल्या या इंजेक्शनच्या वितरणात आणि प्राप्त करून घेण्यात कोणतीही दिरंगाई चालणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनपैकी १० टक्के साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हा साठा शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, फ्रंटलाईन वर्कर्स ज्यामध्ये पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स व इतर कर्मचारी, तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. रेमडेसिविरच्या खरेदी विक्रीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमांतर्गत कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षांनी दिला आहे.
दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शन हे आवश्यक असेल त्या रुग्णांनाच देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.