मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत ६९४९ अर्ज प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:46+5:302020-12-11T04:44:46+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे. ऑक्टोबर ...
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित ठिकाणी पोहचविणे शक्य नव्हते. सर्वत्र चिखल झाल्यामुळे वाहन नेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाचा वेग मंदावला होता. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अडचणीही निर्माण झाल्या. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देऊन त्याच्यासाठी दिवसाच्या विजेचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सदर योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत १३ कंपन्यांच्या मदतीने सौर कृषी पंप बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या कामाने आता गती घेतली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात आजपावेतो ६ हजार ९४९ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज रद्द करण्यात आले. सौर कृषी पंपासाठी ३ हजार ५०१ कोटेशनचे वितरण करण्यात आले असून, त्यापैकी २ हजार २३२ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे.
दरम्यान, २ हजार २०२ शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत १ हजार ६७२ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची जोडणी देण्यात आली असून, सद्य:स्थितीत २४८ कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून येत आहे. या योजनेमुळे १ हजार ६७२ शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न होणार पूर्ण
शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी रात्रीच वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. या योजनेचा असंख्य शेतकरी लाभ घेत असून त्यांच्या दिवसा विजेचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.