बिंदुनामावली दुरुस्त करून शिक्षक भरती घ्या; विद्यार्थी संघटनांची शिक्षण आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:05 PM2023-08-24T17:05:49+5:302023-08-24T17:06:30+5:30
शिक्षण विभागाची बिंदुनामावली सदोषित असून, ती दुरूस्त करावी व ५५ हजार शिक्षकांची भरती लवकर करावी.
- अविनाश पाईकराव
नांदेड - बिंदुनामावलीत मोठा घोळ असून, बिंदुनामावलीत तत्काळ दुरूस्ती करून शिक्षक भरती करावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असताना, बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, राज्यातील शिक्षण विभागाची बिंदुनामावली सदोषित असून, ती दुरूस्त करावी व ५५ हजार शिक्षकांची भरती लवकर करावी. ज्या संस्था पवित्र पोर्टलवर जागा दाखवत नाहीत अशा संस्था शिक्षण विभागाने ताब्यात घेऊन त्या संस्थेवर शिक्षकांची भरती करावी, संस्थेवरील शिक्षक भरतीमध्ये चालणारा आर्थिक बाजार बंद करून शासनाने जिल्हा परिषद प्रमाणे शिक्षक भरती करावी. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर एक व दोन प्रमाणेच नववी ते बारावीसाठी टीईटी पेपर तीन लागू करावा, केंद्रीय शिक्षण मंडळाप्रमाणे प्रत्येक वर्षी शिक्षक भरती व टीईटी परीक्षेचे आयोजन करावे, यापुढे घेण्यात येणाऱ्या टीईटीचा अभ्यासक्रम सर्वसमावेशक असाच ठेवावा आदी मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रा. बळवंत शिंदे, रविराज राठोड, ॲड. शिवाजी शिंदे, मयूर शिरफुले, बळवंत सावंत, कैलास जाधव, गणेश ढगे, कैलास उपासे, डॉ. साईनाथ कवळे, प्रवीण पौळ, निखिल थेटे, श्रीकांत पवार, प्रा. उत्तम जाधव आदींची उपस्थिती होती.