सरपंचांचा निधी देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:33 AM2018-03-10T00:33:39+5:302018-03-10T00:33:57+5:30

ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्राची सुरुवात करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे़ त्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत, परंतु सदर केंद्रातील आॅपरेटर मानधन व देखभाल दुरुस्ती साहित्य खर्चाचा निधी ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्न व १४ व्या वित्त आयोगातून द्यावा, असा तगादा लावला जात आहे़ कंधार येथील बैठकीत मात्र सरपंचांनी विरोध केल्याचे समोर आले आहे़ आमच्या उत्पन्नावर संक्रांत असल्याची सरपंचांची भावना आहे़

Rejecting Sarpanch funds | सरपंचांचा निधी देण्यास नकार

सरपंचांचा निधी देण्यास नकार

googlenewsNext
ठळक मुद्देकंधार तालुका : आपले सरकार सेवा केंद्रावरील खर्चास निधी देण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्राची सुरुवात करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे़ त्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत, परंतु सदर केंद्रातील आॅपरेटर मानधन व देखभाल दुरुस्ती साहित्य खर्चाचा निधी ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्न व १४ व्या वित्त आयोगातून द्यावा, असा तगादा लावला जात आहे़ कंधार येथील बैठकीत मात्र सरपंचांनी विरोध केल्याचे समोर आले आहे़ आमच्या उत्पन्नावर संक्रांत असल्याची सरपंचांची भावना आहे़
पंचायतराज संस्थाच्या कारभारात ई-पंचायत प्रकल्पांर्गत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक सेवा दाखले त्याच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध पद्धतीने मिळणे, ग्रामीण जनतेला इतर सेवा एकाच केंद्रावर मिळाव्यात, आदींसाठी ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला़ त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे़ परंतु या केंद्रासाठी लागणारे साहित्य-देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळ तांत्रिक आदीवरचा खर्च मात्र कळीचा मुद्दा बनत चालला आहे़ अशीच स्थिती कंधार येथील बैठकीतून समोर आली आहे़
कंधार पं़स़च्या बचत भवनात ५ मार्च रोजी सरपंच-ग्रामसेवक यांची विविध विषयांवर संयुक्त बैठक पार पडली़ बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक, अधिकारी आदींची उपस्थिती होती़ बैठकीत आमचा गाव आमचा विकास आराखडा २०१७-१८ चा प्लान प्लसमध्ये आॅनलाईन करणे, ग्रा़पं़ अभिलेखे १ ते ३३ नमुने आॅनलाईन करणे, १ एप्रिल २०१८ पासून पेपरलेस काम करणे, ग्रा़ पं़ सरपंच, उपसरपंच, सदस्य माहिती आॅनलाईन करणे, हर घर बिजलीसाठी सर्वेक्षण करणे, ३ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात विद्युत सहाय्यक निवड करणे, आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणे आदी विषयांवर चर्चा झाली, परंतु सेवा केंद्रावरील ग्रा़पं़नी द्यावयाच्या निधीसाठी सरपंचांनी निवेदन देवून व बैठकीत विरोध केला असल्याचे समोर आले़
सेवा केंद्रासाठी १५ लाख व त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींनी १ लाख ४७ हजार ९७२ रुपये वार्षिक निधी जि़प़ खात्यात वर्ग करावा आणि कमी उत्पन्न असलेल्या दोन ग्रा़पं़नी निधी वर्ग करावा, अशी माहिती देताच सरपंचांनी विरोध दर्शविला़

‘ग्रामपंचायतीवर जबाबदारी टाकू नका’
गावचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे़ शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आदी विकास आराखडा कामांना खर्च करावा लागणार आहे़ जि़प़ खात्यात जमा करावी लागणारी रक्कम शासनाने द्यावी, ग्रा़पं़वर जबाबदारी टाकू नये, विकास आराखड्यात नसलेला निधी वर्ग करणे शक्य नाही़ याचा पुनर्विचार करावा -बालाजी देवकांबळे, सरपंच, फुलवऴ

आॅपरेटर मानधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची जबाबदारी शासनाने उचलावी़ दुष्काळामुळे नागरिक विविध कर भरणा करण्यासाठी अडचणी सांगत आहेत़ वसुलीसाठी दमछाक होत आहे़ उत्पन्नासाठी कसरत होत असताना निधी वर्ग करण्याची समस्या आहे़ त्यात पुन्हा विकास कसा करायचा, हा प्रश्न आहे -सुलताना बेगम बबर महंमद (सरपंच, कोटबाजार), गयाबाई सोमवारे (सरपंच, नारनाळी)

Web Title: Rejecting Sarpanch funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.