प्रेत घेऊन नातेवाईकांचा आठ तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:24 AM2018-05-14T00:24:36+5:302018-05-14T00:45:41+5:30
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्याच्या धास्तीने एकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिमायतनगर : तालुक्यातील एकंबा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्याच्या धास्तीने एकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी घडली. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या आवारात प्रेत ठेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरत तब्बल ८ तास ठिय्या दिला.
मयत युवक गजानन माधव नरवाडे (वय २७) याने गावातील घर क्रमांक २२० च्या जागेचे बांधकाम करण्यास ९ एप्रिल रोजी सुरुवात केली होती. घराचे काम सुरु असताना गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दत्ता पुंजाराम कोकेवाड, सौरभ दत्ता कोकेवाड, सरस्वताबाई दत्ता कोकेवाड, पुंजाराम महादा कोकेवाड यांनी मयत युवक गजानन माधव नरवाडे यांच्या बांधकामात अडथळा निर्माण करून सदरची जागा माझी आहे असा घाट घालत शिवीगाळ केली. आणि राजकीय वरदहस्ताने बांधकाम करण्यास अडथळा निर्माण करून घरालगतच तीन पत्रे टाकून जागा बळकावली. त्यामुळे मयत युवकाच्या आईची मनस्थिती बिघडून डोक्यावर परिणाम झाला.
त्यामुळे मयत युवकाने याबाबत हिमायतनगर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध २२ एप्रिल रोजी तक्रार देऊन मानसिक स्थिती बिघडविणाऱ्या व मारण्याची धमकी देणाºयांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. तसेच दिलेल्या तक्रारीत माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास यास कोकेवाड परिवार आणि त्यांचे सहकारी जबाबदार राहतील असेही नमूद करण्यात आले होते. परंतु, हिमायतनगर पोलिसांनी त्याच्या अर्जाची दाखल घेतली नसल्याने त्याच्या मनावर परिणाम होऊन १३ च्या मध्यरात्री युवकाने शेतातील तणनाशक हे विषारी औषध प्राशन केले. याची माहिती मिळताच तातडीने नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले़ उपचार सुरु असताना युवक गजानन माधव नरवाडे याची प्राणज्योत मालविली.
या घटनेने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात रोष व्यक्त करत हिमायतनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सकाळी ८ वाजल्यापासून नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात प्रेत ठेवलेले असतानादेखील पोलिसांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला.
पोलिसांनी जर मयताच्या अर्जाची दखल घेतली असली तर आज गजानन जिवंत राहिला असता असे म्हणत हंबरडा फोडला होता.
दरम्यान, सायंकाळी पोलिसांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दत्ता पुंजाराम कोकेवाड, सरस्वताबाई दत्ता कोकेवाड, सौरभ दत्ता कोकेवाड, पोलीस पाटील प्रेम गणपत पोगुलवाड आणि कैलास गणपत पोगुलवाड या पाच जणांवर कलम ३०६, ३४ भादंविनुसार मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटलासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून, वरील आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताा दिली.