Remedesivir Shortage : मराठवाड्यात रेमडेसिविरचा पुरवठा विस्कळीतच; मागणी ८९ हजारची मिळणार ५० हजार ४९५ इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 02:47 PM2021-05-08T14:47:08+5:302021-05-08T14:58:13+5:30

Remedesivir Shortage : एचआरसीटी चाचणीत हा स्कोअर ९ च्या पुढे गेल्यानंतर तसेच रुग्णाचा ताप आटोक्यात येत नसेल तर रेमडेसिविर दिले जाते.

Remedesivir Shortage : In Marathwada, supply of Remedesivir is disrupted; Demand of 89 thousand will get 50 thousand 495 injections | Remedesivir Shortage : मराठवाड्यात रेमडेसिविरचा पुरवठा विस्कळीतच; मागणी ८९ हजारची मिळणार ५० हजार ४९५ इंजेक्शन

Remedesivir Shortage : मराठवाड्यात रेमडेसिविरचा पुरवठा विस्कळीतच; मागणी ८९ हजारची मिळणार ५० हजार ४९५ इंजेक्शन

googlenewsNext
ठळक मुद्देरेमडेसिविर विषाणूवर मात करणारे ॲन्टीव्हायरल औषध आहे. इबोला या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी ते विकसित करण्यात आले होते.तेच इंजेक्शन आता कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येते.

- विशाल सोनटक्के

नांदेड : गंभीर संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. काही दिवसांपासून या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, पुरवठा सुरळीत झाला नाही. १ ते ९ मे या कालावधीसाठी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांना ८९,१२७ इंजेक्शन देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, केवळ ५० हजार ४९५ इंजेक्शन मिळणार आहेत.

रेमडेसिविर विषाणूवर मात करणारे ॲन्टीव्हायरल औषध आहे. इबोला या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी ते विकसित करण्यात आले होते. तेच इंजेक्शन आता कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येते. कोरोनाबाधिताच्या फुफ्फुसाला संसर्ग होतो. एचआरसीटी चाचणीत हा स्कोअर ९ च्या पुढे गेल्यानंतर तसेच रुग्णाचा ताप आटोक्यात येत नसेल तर रेमडेसिविर दिले जाते. सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड उपचारासाठी या इंजेक्शनची शिफारस केली होती. त्यानुसार ३० जून २०२० पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागले. राज्य शासनाने १ हजार ४०० रुपयांपेक्षा जास्त पैसे या इंजेक्शनसाठी देऊ नका असे स्पष्ट सांगितले असले तरी मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. २० ते ४० हजारालाही इंजेक्शन खरेदी करणारे अनेकजण भेटतात. मध्यंतरीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिविर कोरोनाच्या उपचारातून काढून टाकले मात्र त्यानंतरही या इंजेक्शनची मागणी कायम आहे.

२१ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना ५५ हजार २४१ इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले हाेते. मात्र, या कालावधीत केवळ ४१ हजार ७३७ इंजेक्शनचा पुरवठा झाला. त्यानंतर काही जिल्ह्यांतून इंजेक्शनची मागणी वाढल्यानंतर जिल्हानिहाय पुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले. आता १ ते ९ मे या कालावधीसाठी मराठवाड्याला ८९ हजार १२७ इंजेक्शन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, याही वेळी इंजेक्शनचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असून ९ मेपर्यंत ५० हजार ४९५ इंजेक्शन देण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस इंजेक्शनचा तुटवडा कायम राहण्याचीच शक्यता आहे.

गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करायला हवा
राज्य शासनाने जिल्हानिहाय इंजेक्शनचा कोटा निश्चित केला आहे. मध्यंतरीच्या काळात मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत होती. मात्र आता काहीशी परिस्थिती सुधारल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही मागणीपेक्षा कमी इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांनी गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करायला हवा, एचआरसीटी स्कोअर ९ पेक्षा कमी असेल तर हे इंजेक्शन रुग्णाला देण्याची गरज नाही.
- डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी, नांदेड

Web Title: Remedesivir Shortage : In Marathwada, supply of Remedesivir is disrupted; Demand of 89 thousand will get 50 thousand 495 injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.