मुख्याधिकारी सुंकेवार यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:46+5:302021-05-06T04:18:46+5:30
वाळूची चोरी धर्माबाद : तालुक्यातील संगम व परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. वाळू चोरट्यांना ...
वाळूची चोरी
धर्माबाद : तालुक्यातील संगम व परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. वाळू चोरट्यांना महसूल प्रशासनाचे अभय मिळत आहे. बिलोली तालुक्यातील हुनगुंदा वाळू घाटातून सहा हजार ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी असताना त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू उपसा केला जात आहे. दररोज जवळपास ३५ वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करतात. या वाळूघाटाच्या नावावर काही वाळू तस्कर संगम व परिसरातील गोदावरी नदीच्या वाळू पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत आहेत.
मासळी विक्रीचे उद्घाटन
लोहा : कृषी विभागाच्या एनएचएम योजनेतून विकेल ते पिकेल अंतर्गत घेतलेल्या सायाळ येथील शेतकरी साहेबराव पवार यांच्या शेततळ्यातील मासळी विक्रीचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळू पाटील, कृषी सहाय्यक दुधाटे, वाघमारे उपस्थित होते.
खासगी कर्ज वसुली करणे थांबवा
कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व तालुक्यात मायक्रो फायनान्स व इतर शासकीय - निमशासकीय तथा खासगी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी धमकीवजा भाषेचा वापर करीत आहेत. लॉकडाऊनमुळे अगोदरच लोक अडचणीत सापडलेले आहेत.
बाजारपेठेत जांभळे दाखल
नांदेड : शहरातील बाजारपेठेत जांभूळ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारण जांभूळ विक्रीसाठी येतात. सध्या ६० रुपये पावकिलोप्रमाणे जांभळाची विक्री होत आहे. मंगळवारी अनेकांनी या जांभळाची खरेदी केली.
मोंढा बाजारपेठेतील उलाढाल ठप्प
नांदेड : कोरोनाच्या संसर्गामुूळे जिल्ह्यातील मोंढा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामाचे वेध लागले असून, प्रत्यक्षात कृषिनिविष्ठांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाहतूक बंद असल्याने खते, बियाणे खरेदी ठप्प असून, मोंढ्यातील उलाढालीवर परिणाम झाला आहे.
बसस्थानकावर शुकशुकाट
देगलूर : मागील महिनाभरपासून देगलूर आगारातून सुटणाऱ्या बहुतांश बसेस बंद आहेत. कोरोना संसर्गामुळे जिल्हाबाहेर आणि जिल्ह्यातील अशा दोन्ही सेवा महामंडळाने कमी केल्या. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. एरव्ही प्रवाशांनी गजबजलेली बसस्थानके सध्या ओस पडली आहेत.
रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दोन दिवसांपूर्वी ११ गाड्या बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या घटली असली तरी बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय प्रवासी निवडत होते. मात्र रेल्वे प्रशासनाने अचानक ११ रेल्वे बंद केल्याने औरंगाबाद, पुणे, मुंबईसह आंध्र प्रदेश, तेलंगणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
आचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
नांदेड : लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्नसोहळे ठप्प असल्याने आचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. मागील दोन महिन्यात एक रुपयाचेही उत्पन्न न झाल्याने राज्य शासनाने आचाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत होत आहे.
जिल्हा परिषद परिसरात शुकशुकाट
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्येतही कपात करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त येणाऱ्यांची संख्याही घटली आहे. परिणामी जिल्हा परिषद परिसरात शुकशुकाट दिसत आहे.
घरकुलाची कामे अर्धवट
मुखेड : रमाई आवास आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थींच्या घरांची कामे रखडली आहेत. काही लाभार्थींना वाळूची तर काहींना वेळेत हप्ता मिळाला नसल्याने बांधकामे बंद ठेवावी लागली. प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप लाभार्थींचा आहे.
रुग्णवाहिका चालकांचा सत्कार
हदगाव : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णावाहिकांवर चालक म्हणून रुग्णसेवा देणाऱ्यांचा आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये तामसा, आष्टी, बरडशेवाळा, निमगाव, वायफना येथील रुग्णवाहिका चालकांचा समावेश आहे. कार्यक्रमाला सरपंच बालाजी महाजन, वैद्यकीय अधिकारी बोंदरवाड, सपोनि अशोक उजगरे, आष्टीचे डॉ.नितेश जुमड, डॉ.खानजोडे, डॉ.सचिन संगपवाड, सुभाष राठोड आदी उपस्थित होते.
जिल्ह्यांतर्गत बदल्या पडताळणी
लोहा : शिक्षण विभाग पंचायत समिती लोह्याच्या वतीने जिल्हाअंतर्गत बदल्या पडताळणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. पडताळणीसाठी बदली त्रिसदस्यीय समितीत गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांचा समावेश होता. पडताळणी प्रक्रियेसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, विस्तार अधिकारी बी.आर. शिंदे, सहशिक्षक दिलीप सोनवळे, साधनव्यक्ती रामदास कस्तुरे, विशेष तज्ज्ञ रफीक दौलताबादी यांनी परिश्रम घेतले.