संशोधक, पक्षी मित्र नागरिक करणार 'बर्डस् ऑफ नांदेड'ची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:31 PM2020-11-05T18:31:18+5:302020-11-05T18:31:54+5:30
पद्मविभुषण स्व.डॉ.सलीम अली आणि पक्षी अभ्यासक लेखक मारोती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसानिमित्त ५ ते१२ नोव्हेंबर या कालावधीत नांदेडसह राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
नांदेड- निसर्ग मित्रमंडळाच्या पुढाकारातून आणि पक्षी मित्रांच्या सहकार्यातून बुधवारी पहाटे पक्षी सप्ताहाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या हस्ते झाला. संशोधकांच्या माध्यमातून पक्षांचे निरीक्षण तसेच अभ्यास करण्यात येणार असून पक्षी मित्र नागरिकांची मते जाणून 'बर्डस् ऑफ नांदेड'ची निवड करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पद्मविभुषण स्व.डॉ.सलीम अली आणि पक्षी अभ्यासक लेखक मारोती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसानिमित्त ५ ते१२ नोव्हेंबर या कालावधीत नांदेडसह राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी गोदावरी नदीच्या काठावर वन्य जीव छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्याया कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्यासह उपवनसंरक्षक सातेलीकर, परिविक्षाधीन वनाधिकारी मधुमिता, सहाय्यक वनसंरक्षक डी.एस.पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी याकरीता शासन प्रयत्नशिल आहे.पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे.जगभरातील पक्षांची जैवविविधता झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे.अनेक पक्षी, प्रजाती दुर्मिळ श्रेणीत समाविष्ट होत आहेत. त्यामुळे पक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी स्पष्ट व्हावी म्हणून व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तर उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर यांनी नांदेड परिसरातील पक्षांची अवास्थाने शोधुन संरक्षण करण्याची जबाबदारी पक्षी मित्रांनी घ्यावी असे आवाहन केले. शेवटी विजय होकर्णे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सुरेश जोंधळे, दिलीप ठाकुर, हर्षद शहा, रवी डोईफोडे, डॉ.जगदीश देशमुख, पंकज शिरभाते, शिरीष गिते, प्रा.शिवाजी जाधव, सुषमा ठाकुर, सदा वडजे, सारंग नेरलकर, उमाकांत जोशी, लक्ष्मण संगेवार, डॉ.अनिल साखरे, डॉ.शैलेश कुलकर्णी, डॉ.प्रमोद देशपांडे आदींची उपस्थिती होती.