'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 04:32 PM2023-10-24T16:32:44+5:302023-10-24T16:33:11+5:30

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे.

'Resign for the Maratha community'; Protesters shout slogans at Ashok Chavan's program | 'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी

'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी

- गोविंद टेकाळे 
अर्धापूर (जिल्हा नांदेड) :
कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाणांच्या अर्धापूर येथील एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजासाठी राजीनामा द्या, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

अर्धापूर शहरात वडगाव ( ता. हदगाव) येथील तरूणाने, नायगाव तालुक्यातील भोपळा येथील विद्यार्थी आणि हिमायत नगर येथील एका तरुणाने अशा जिल्ह्यातील तिघांनी मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांत आत्महत्या केली. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे. आज तालुक्यातील भाऊराव कारखाना येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण उपस्थित होते.यावेळी भास्करराव खतगावकर, अमर राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, चव्हाण भाषण करत असतानाच मराठा आरक्षणाची मागणी करत काही तरुणांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाच्या सन्मानार्थ राजीनामा द्या., अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पिंपळगाव महादेव येथील जगन कल्याणकर, दिगंबर कल्याणकर व शैलेश कल्याणकर अशी आंदोलकांची नावे आहेत.

अर्धापुरातील प्रत्येक गावात नेत्यांना गावबंदी..
सोमवारी अर्धापूर येथील सकल मराठा  समाजाने प्रत्येक गावात मुख्य ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना गाव बंदीचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात नेत्यांना गावबंदी केली आहे. नेत्यांना तालुका बंदीचे फलक लवकरच लावण्यात येतील अशी माहिती संयोजक समितीने दिली आहे.

मीच टार्गेट का ?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. मात्र, माझ्या भागातील आंदोलक मलाच टार्गेट का करत आहेत ? तिकडे लोहा, कंधार, मुखेड या भागात का आंदोलने होत नाहीत?  हे मराठा समाजाच्या आपल्या पोरांनी समजून घेतले पाहिजे. आरक्षण देणे हा राज्याचा विषय नसून केंद्राचा विषय आहे. ईडब्ल्यूएस च्या धर्तीवर केंद्राने आरक्षण दिले पाहिजे, असे आ. चव्हाण म्हणाले.

Web Title: 'Resign for the Maratha community'; Protesters shout slogans at Ashok Chavan's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.