२ कोटी ४९ लाखांच्या कामांचा बिलोली नगरपालिकेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:26 AM2019-03-06T00:26:46+5:302019-03-06T00:26:52+5:30
बिलोली नगरपालिकेत नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली विशेष सभा घेण्यात आली असून शहरात २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची कामे होणार आहेत.
बिलोली : बिलोली नगरपालिकेत नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली विशेष सभा घेण्यात आली असून शहरात २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची कामे होणार आहेत. यावेळी मुख्याधिकारी टी.डी.कांंबळे, उपाध्यक्ष मारोती पटाईत यांची प्रमुख उपस्थिती होती.
बिलोली शहरात अनेक दिवसांपासून नागरिक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मागणी असलेल्या गांधीनगर भागातील रस्ते बांधकामाच्या निविदेबाबतच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ईदगाह गल्लीतील कत्तलखाना मार्गाकडील रस्ते व नाली बांधकामासाठीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. शासन नियमानुसार जादा दराची निविदा देणे हे पालिकेच्या हिताचे नसून ऐनवेळी दोन कमी बोलीच्या निविदाधारकांनी माघार घेऊन परस्पर संगनमत केल्याने पालिकेला आर्थिक भूर्दंड बसू नये व फेरनिविदा काढण्याविषयी अनुप अंकुशकर यांनी आक्षेप घेतला. तर उपस्थित १३ नगरसेवकांपैकी काँग्रेस, शहर आघाडी व अपक्ष अशा १२ नगरसेवकांनी विशेष निधीतील कामांना तात्काळ मंजुरी देवून कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी सभागृहाला केली.
१२ नगरसेवकांसह माजी नगराध्यक्ष रणवीरसिंह चौहान, शंकरराव अंकुशकर, ए. जी. कुरेशी यांच्यासह अनेकांनी कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.
या सभेला नगरसेविका राधा पटाईत, महानंदा देशमुख, अनुजा शंखपाळे, मैमुना बेगम अमजत चाऊस, नगरसेवक अरुण उप्पलवार, लक्ष्मण शेट्टीवार, शाहेदबेग ईनामदार, जावेद कुरेशी, आघाडीचे विरोधी पक्षनेते अनुप अंकुशकर, प्रकाश पोवाडे, चंद्रकलाबाई चंचलवाड व अपक्ष नगरसेविका गोदावरीबाई पुप्पलवार यांची उपस्थिती तर काँग्रेसचे तीन व आघाडीच्या एक नगरसेविकेची अनुपस्थिती होती.
विशेष सभेत २ कोटी ४९ लाखांच्या विविध कामांच्या निविदा प्राप्त झाल्या. न.प.प्रशासनाकडून निविदांचा तुलनात्मक तक्ता सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. सभागृहातील उपस्थित १३ नगरसेवकांपैकी १२ जणांंनी विकासकामे तात्काळ होण्यासंदर्भात संमती दर्शविल्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यात येईल - त्र्यंबक कांबळे, मुख्याधिकारी न.प.बिलोली़