जबाबदारी आरोग्य विभागाची; खापर मात्र वैद्यकीय शिक्षणावर; मृत्यूचा आकडा ६६ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:56 AM2023-10-07T05:56:31+5:302023-10-07T05:56:43+5:30
नांदेडला आरोग्यमंत्र्यांची प्रतीक्षाच
नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या पाच दिवसांत ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मंत्री, विरोधी पक्षनेत्यांचे दौरे झाले, खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करून घेतली; परंतु राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत अद्यापही नांदेडकडे फिरकले नाहीत. मृत्यू झालेल्यांपैकी ७१ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयातून आलेले आहेत. ते पाहता मृत्यूची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. मात्र, त्याचे सर्व खापर मात्र वैद्यकीय शिक्षण विभागावर फुटत असल्याचे स्पष्ट होते.
दि.२ ऑक्टोबरच्या रात्री २४ तासांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूमागे औषधांचा तुटवडा हे प्रमुख कारण पुढे आले. या २४ पैकी १७ रुग्ण हे परभणी, लोहा यासारख्या ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय महाविद्यालयाकडे ‘रेफर’ केल्याचे आढळून आले.
सर्वच खोटे कसे बोलू शकतात?
वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत औषधसाठा मुबलक उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ही बाब खोटी ठरली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणनेही मंत्र्यांची ‘री’ ओढली; परंतु प्रत्यक्षात आजही औषधांसाठी रुग्णाच्या नातेवाइकांना चिठ्ठ्या मिळत असून, त्यांना ती खासगीतून खरेदी करावी लागत असल्याची ओरड कायम आहे.
आरोग्यमंत्र्यांचा हात झटकण्याचा प्रयत्न !
नाशिक : औषध खरेदी रखडलेली नव्हती, असे सांगतानाच नांदेड प्रकरणातील दोष राज्याच्या आरोग्य विभागाचा नसून वैद्यकीय शिक्षण विभाग आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी असल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, गुजरात आणि कर्नाटक या पाच राज्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, दुसरे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल आदी उपस्थित होते.