‘प्रतिभा निकेतन’मुळे मिळाली समाजपरिवर्तनाची प्रेरणासेवानिवृत्त माजी मुख्याध्यापिका उज्ज्वला सूर्यवंशी यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:47+5:302021-01-08T04:53:47+5:30
येथील सराफा भागातील प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उज्ज्वला सूर्यवंशी या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांना ...
येथील सराफा भागातील प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उज्ज्वला सूर्यवंशी या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांना संस्था आणि शाळेच्या वतीने श्रीनगर येथील शाळेत सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका रत्नमाला ठाकूर या होत्या तर माजी मुख्याध्यापक रोहिदास कांबळे मुख्याध्यापिका सविता कट्टी, शिक्षक प्रतिनिधी विजय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भावी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी प्राथमिक शिक्षण हा पाया असून देशाभिमान, सामाजिक जाणिवा, आणि मूल्यांची जोपासना शालेय विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी शिक्षकांची खरी कसोटी असते. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आयुष्यभर काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते, असे उज्ज्वला सूर्यवंशी म्हणाल्या. संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी व पालक यांचे बहुमोल सहकार्य लाभले. त्यामुळे मला प्रामाणिकपणे काम करता आले. सेवानिवृत्तीनंतरदेखील आपण शिक्षण क्षेत्रात मोठे काम करण्याचा संकल्प केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सूर्यवंशी व माजी मुख्याध्यापिका शोभा आडेराव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विजय सिंग ठाकूर, रोहिदास कांबळे, रवींद्र देशपांडे, लता बरगळे, सविता कट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन रवी सोनवणे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार लता बरगळे यांनी मानले.