"बिनशर्त माघारी व्हा"; आमदार बालाजी कल्याणकरांना शिवसैनिकांचा दोन दिवसांचा अल्टीमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 05:10 PM2022-06-25T17:10:51+5:302022-06-25T17:11:23+5:30
कल्याणकर यांनी मातोश्रीशी गद्दारी केली. त्यांना सरंक्षण देण्याचे काम भाजपची मंडळी करत आहेत, परंतु आम्ही शिवसैनिक असून त्यांना धडा शिकवला जाईल.
नांदेड : नगरसेवक होण्याची ज्याची पात्रता नाही, अशा बालाजी कल्याणकर या दगडाला उद्धव ठाकरे यांनी शेंदूर फासला म्हणून तो देव झाला. आज शिवसैनिकांच्या जीवावर आमदार झालेल्या बालाजी कल्याणकर यांनी दोन दिवसांत बिनशर्त माघारी यावे, आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. जर असे झाले नाही तर नांदेडात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकानी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारावार, भुजंग पाटील, मनोज भंडारी, माधव पावडे, गजानन कदम, महेश खेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसैनिकांच्या जीवावर आमदार झाले आहेत, त्यांना कोणीही ओळखत नव्हते केवळ सामान्य शिवसैनिक आमदार व्हावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि आमदार केले. आज कल्याणकर यांनी मातोश्रीशी गद्दारी केली. त्यांना सरंक्षण देण्याचे काम भाजपची मंडळी करत आहेत, परंतु आम्ही शिवसैनिक असून त्यांना धडा शिकवला जाईल. जर त्यांना जबरदस्ती नेले असेल तर दोन दिवसात आमदार कल्याणकर यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी प्रकाश मारावार, भुजंग पाटील यांनी केली आहे.
आमदार पत्नीचा देसाई यांना फोन
आमदार बालाजी कल्याणकर हे स्वतः होऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले नाही तर त्यांना जबरदस्ती नेण्यात आलं असं त्यांच्या पत्नीने अनिल देसाई सांगितले. त्यामुळे आम्ही शांत होतो, परंतु त्यांना जबरदस्ती केली नाही तर स्वतः होऊन गेले, त्यामुळे आम्ही त्यांना इशारा देत आहोत, असे भुजंग पाटील यांनी सांगितले.