महाविकास आघाडीतील धुसफूस उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:16+5:302021-08-26T04:21:16+5:30
नांदेड : तीन पक्षांचे सरकार असलेल्या महाविकास आघाडीत गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्री, आमदारांच्या स्तरावर नाराजी आहे. महिला व ...
नांदेड : तीन पक्षांचे सरकार असलेल्या महाविकास आघाडीत गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्री, आमदारांच्या स्तरावर नाराजी आहे. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले हाेते. मुंबईस्तरावरील ही नाराजी आता जिल्हास्तरावरसुद्धा पोहोचली असून, उघडपणे ती व्यक्तही केली जात आहे. मंगळवारी नांदेडमध्ये झालेल्या चार जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या नाराजीचा प्रत्यय आला. नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी या चार जिल्ह्यांतील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथे पार पडली. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अर्धा डझन मंत्री, माजी मंत्री, आमदार या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत सर्व जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करीत बहुतांश अध्यक्षांनी आपली व्यथा मांडली. काँग्रेस सत्तेत असूनही कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, मंडळ, महामंडळ, समित्यांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत, त्यात शिवसेना व राष्ट्रवादीचा अडसर ठरतो आहे. पक्षाचे मंत्री, आमदार असूनही साधे पत्र कार्यकर्त्याला मिळत नाही. जनतेची कामेही मार्गी लागत नाहीत. अधिकारी वर्ग कार्यकर्त्यांना किंमत देत नाही. विकास निधी मिळत नाही. पक्षात वरिष्ठांकडून मानसन्मान दिला जात नाही, अशा अनेक तक्रारी पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.
चारही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात झालेल्या तक्रारींची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगेच दखल घेत पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही, जो प्रतिसाद देत नसेल त्याचा रिपोर्ट मला पाठवा, असे सांगून कार्यकर्त्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी अनेक जिल्ह्यांत शिवसेना व राष्ट्रवादीचीसुद्धा काँग्रेसवर नाराजी आहे. नांदेडही त्याला अपवाद नाही. काँग्रेसकडून मानसन्मान मिळत नाही. शासकीय कार्यक्रमाला पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांना बोलावले जात नाही. बैठकांमध्ये बोलू दिले जात नाही. जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांमध्ये सामावून घेतले जात नाही, अशी सरसकट ओरड सेना व राष्ट्रवादीच्या गोटातून ऐकायला मिळते. ही नाराजी केवळ बोलण्यापुरती नसून काही दिवसांपूर्वी काळे झेंडे दाखविण्यापर्यंत या नाराजांची मजल पाेहोचली होती. यावरून जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये किती ‘सलोखा’ असेल याचा अंदाज येतो.