नियोजन भवन बांधकामाच्या १७ कोटी ८२ लाखांच्या अंदाजपत्रकास सुधारित मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:01+5:302021-02-07T04:17:01+5:30
नियोजन भवनच्या बांधकामाकरिता मूळ प्रशासकीय मान्यता ७ कोटी ५० लाख व १६ मार्च २०१३ च्या शासन निर्णयान्वये २ कोटी ...
नियोजन भवनच्या बांधकामाकरिता मूळ प्रशासकीय मान्यता ७ कोटी ५० लाख व १६ मार्च २०१३ च्या शासन निर्णयान्वये २ कोटी ६५ लाख ३० हजार रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह देण्यात आलेली प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता १० कोटी १५ लाख ३० हजार रुपये ही विचारात घेता तद्नंतर जिल्हा नियोजन समितीच्या निर्देशाप्रमाणे करण्यात आलेल्या एकूण ११ कामांसह संचयी १७ कोटी ८२ लाख १९ हजार रुपये किमतीच्या विविध बांधकामाच्या खर्चास मंजुरी देणे आवश्यक असल्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे १५ मे २०१९ च्या पत्रान्वये केली होती. नियोजन भवन इमारत बांधकामाची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेची १७ कोटी ८२ लाख १९ हजार ही रक्कम मूळ प्रशासकीय मान्यतेच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यामुळे नियोजन विभागाच्या १६ फेब्रुवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार मूळ प्रशासकीय मान्यतेपेक्षा ३० टक्क्यांपर्यंतच्या जास्त रकमेच्या प्रस्तावाला आवश्यकतेप्रमाणे सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागास आहेत. त्यामुळे शासनाच्या नियोजन विभागाने प्राप्त प्रस्तावाची छाननी करून नांदेड येथील नियोजन भवनच्या बांधकामाच्या १७ कोटी ८२ लाख १९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.