नांदेड जिल्हा परिषदेचे 'राईट टू सर्विस'चे वर्षभराचे रेकॉर्ड गायब
By शिवराज बिचेवार | Published: August 23, 2023 03:57 PM2023-08-23T15:57:49+5:302023-08-23T15:59:44+5:30
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून दर दोन महिन्याला जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला भेटी देण्यात येत आहेत.
नांदेड-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात प्रत्येक टेबलवर जावून रेकॉर्ड तपासत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. आरटीएस (राईट टू सर्विस) चे वर्षभराचे रेकाॅर्ड गायब असल्याचे निदर्शनास येताच तिघांना ताबडतोब नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. मी येणार म्हणून रजिस्टरवर सह्या मारुन ठेवल्या का? तुम्ही माझ्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात आयुक्त मांढरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. मांढरेंचा हा रौद्र अवतार पाहून शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र चांगलाच घाम फुटला होता.
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून दर दोन महिन्याला जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला भेटी देण्यात येत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, आरटीएस यासह नवनवीन उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही? त्यामध्ये चालढकल करण्यात येत आहे का? यासह इतर बाबींची तपासणी केली जाते. बुधवारी शिक्षण आयुक्त मांढरे हे नांदेडला येण्याच्या बातमीनेच शिक्षण विभागाला कापरे भरले हाेते. बुधवारी सकाळी मांढरे यांनी प्राथमिक शिक्षण विभागापासून तपासणीस सुुरुवात केली. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल या ही होत्या. प्रत्येक टेबल निहाय त्यांनी रजिस्टर तपासणी केली. यावेळी रजिस्टरमधील अनेक त्रुटी त्यांनी काढल्या. आरोग्य विभागाच्या बिलांच्या रजिस्टरमधील माहिती घेतली.
तसेच वेतन विभाग, न्यायालयीन प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागात त्यांनी आरटीएसचे रजिस्टर तपासले. या रजिस्टरवर नोंदी करण्यात आल्या होत्या. तसेच सर्वांच्या स्वाक्षरीही होत्या. परंतु वर्षभराचे रेकॉर्डच गायब होते. हे पाहून मांढरे यांनी शिक्षणाधिकारी दिग्रसकर, ओएस आणि संबधित कर्मचाऱ्याला धारेवर धरले. मी येणार म्हणून रजिस्टरवर नोंदी करुन ठेवल्या काय? एक वर्षाचे रेकाॅर्ड गायब आहे, ओएस तुम्ही काम करताय? जेव्ही व्हिडीओ कॉन्फरन्स होते तेव्हा कान बंद करुन ठेवता का? आरटीएसची अंमलबजावणीच होत नाही. अन् मला चुकीची माहिती देता का? अशा शब्दात खडसावले. तसेच दिग्रसकर यांच्यासह तिघांनाही ताबडतोब नोटीसा बजावून उद्यापर्यंत खुलासा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर मांढरे यांनी आपला मोर्चा पुन्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडे वळविला. येथे शालेय पोषण आहार यासह इतर माहितीवरुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत तुमच्यामुळे सीईओंच्या नावाने बोंबाबोंब होते, लवकरच रेकाॅर्ड आणा अशा शब्दात शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना फर्मावले. त्यानंतर बिरगे या घाईतच रेकॉर्ड आणण्यासाठी गेल्या. त्यानंतर मांढरे यांनी सीईओंच्या कक्षात बैठक घेतली. दरम्यान, मांढरे यांनी बुधवारी शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचार्यांची चांगलीच शाळा घेतल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरु होती.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे लक्ष
शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शासनाने अनेक उपक्रम सुरु केले आहेत. या उपक्रमांची नीट अंमलबजावणी होते किंवा नाही? आरटीएसमध्ये नागरीकांच्या तक्रारी सोडविल्या जात नसतील तर त्यांनी तक्रार करावी. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणार्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. आजच्या तपासणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यावर काय तो निर्णय होईल. अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली.
भेटीसाठी आलेल्यांचे केले समाधान
आयुक्त मांढरे यांनी आपल्या तपासणी दौर्यात अनेक विषयांची निवेदने घेवून आलेल्या नागरीकांशी चालता-चालताच संवाद साधला. त्यांची नेमकी अडचण जाणून घेत त्यांच्या शंकांचे समाधान केले. तसेच शासन दरबारी त्यांचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले.