रिंधाचा साथीदार आकाशसिंघ गाडीवाले अखेर नांदेड पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 01:53 PM2019-09-11T13:53:50+5:302019-09-11T13:55:39+5:30
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
नांदेड : खून, गोळीबार, खंडणीच्या माध्यमातून नांदेडमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या रिंधाचा कुख्यात साथीदार आकाशसिंघ जगतसिंघ गाडीवाले याला नांदेड पोलिसांनी पंजाब येथून ताब्यात घेतले आहे. तो पंजाबमधील रुपनगर कारागृहात होता. आकाशसिंघ विरुद्ध नांदेडमधील विमानतळ, वजिराबाद आणि नांदेड ग्रामीण ठाण्यात खून, खंडणी आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोक्काही लावला आहे.
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ ९ एप्रिल २०१९ रोजी एका कारचालकावर गोळ्या झाडून कार चोरी करण्यात आली होती. यातील नऊपैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीनजण फरार होते. या गुन्ह्याच्या कटात आकाशसिंघ हा ग्रामीण पोलिसांना हवा होता. तो पंजाबमध्ये कारागृहात असल्याची माहिती तपासादरम्यान मिळाली. नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे तसेच शीघ्रकृती दलाचे एक पथक ४ सप्टेंबर रोजी पंजाबला रवाना झाले. या पथकाने रुपनगर कारागृह चंदीगड येथून आकाश्सिंघला ताब्यात घेतले. त्याला ९ सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या विशेष न्यायालयात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याने हजर केले. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आकाशसिंघ विरुद्ध नांदेड विमानतळ ठाण्यात बचुत्तरसिंघ बाबूसिंग माळी यांचा गोळ्या घालून खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. वजिराबादमध्ये खंडणीचे तीन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तर नांदेड ग्रामीण ठाण्यांतर्गत खून, दरोडा असे गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत. आकाशसिंघविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आकाशसिंघला अटक केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होतील, अशी शक्यताही वर्तविली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील हे करीत आहेत.