औद्योगिक वसाहतीतील रस्ते व कॅनॉल रस्ता चकाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:03+5:302020-12-06T04:19:03+5:30
नांदेड :पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ड्रीम प्रॉजेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या शिवाजीनगर येथील कै.रामगोपाल गुप्ता औद्योगिक वसाहतीतील रस्ते व कॅनॉल रस्ता ...
नांदेड :पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ड्रीम प्रॉजेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या शिवाजीनगर येथील कै.रामगोपाल गुप्ता औद्योगिक वसाहतीतील रस्ते व कॅनॉल रस्ता चकाकणार आहे. या रस्ते व कॅनाॅल कामाला शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. ही दोन्ही कामे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. तर या कामासाठी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांचा पाठपुरावा सुरु आहे.
शहरातील शिवाजीनगर येथील कै. रामगोपाल गुप्ता औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या कामांसाठी पुढाकार घेतला. मार्च महिन्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई व पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधान भवनात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस माजी पालकमंत्री डी.पी.सावंत व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकामासाठी २४.५५ कोटीचा प्रारुप आराखड्यावर चर्चा झाली. त्यातील २५ टक्के हिस्सा हा मनपाने उचलण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे या कामांना शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. आता या कामाचा प्रस्ताव एम.आय.डी.सी.च्या कार्यकारी मंडळापुढे असून लवकरच या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे डी.पी. सावंत यांनी सांगितले.
निळा ते मरळक फाटा रस्ता नव्याने होणार
नांदेड शहरालगत असलेल्या दोन्ही तरोड्यांना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी २००९ मध्ये मनपात समाविष्ट करून घेतले. या दोन्ही तरोड्यातून जाणार्या कॅनॉलची जागा पाटबंधारे विभागाकडून बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. डीआरएम ऑफीसपासून निळा रोडपर्यंत कॅनॉल रस्ता तयार झाला. परंतु निळा जंक्शन ते मरळक फाट्यापर्यंतचा नादुरूस्त कॅनॉल तसाच होता. या पार्श्वभूमीवर मरळक फाटा ते डीआरएम ऑफीस हा संपूर्ण कॅनॉल रस्ता नव्याने नाल्यांसह सिमेंट काँक्रीटमध्ये बनविण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला असून या रस्त्याला सुद्धा तत्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ५ कि.मी.च्या या रस्त्याला आता चकाकी मिळणार आहे.