कोरोनामुळे जामिनावर सुटलेला दरोडेखोर पुन्हा सक्रीय; नांदेडमध्ये भरदिवसा लुटले १५ तोळे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:43 PM2020-07-30T17:43:38+5:302020-07-30T17:46:24+5:30
दरोड्याच्या या घटनेतील मुख्य आरोपी हा काही दिवसांपूर्वीच अमरावती येथील तुरुंगातून जामिनावर सुटला आहे.
नांदेड : शहरातील दत्तनगर भागात असलेल्या एका सराफा दुकानात दुचाकीवरून आलेल्या तीन दरोडेखोरांनी बुधवारी दुकानमालकावर खंजीरने प्राणघातक हल्ला करीत १५ तोळे सोने लुटले. भरदिवसा मुख्य वस्तीत ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ दरोडेखोरांना अनेकांनी पाहिले असून, यापूर्वीही ते या परिसरात आले होते, अशी माहिती रहिवाशांनी दिली़
दत्तनगर येथील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स नावाच्या सराफा दुकानात बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन तिघे जण आले़ त्यांनी दुकानाचे शटर आतून बंद केले़ यावेळी दुकानमालक मुक्तेश्वर शहाणे यांनी विरोध केला असता, त्यांच्यावर खंजीरने हल्ला करण्यात आला़ तसेच दुकानातील १५ तोळे सोने काढून घेतले़ दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकालाही खंजीरचा धाक दाखवून त्याच्याजवळील २५ हजार रुपये काढून घेतले़ त्यानंतर काही मिनिटांतच दरोडेखोरांनी दुचाकीवरुन पोबारा केला़ जखमी झालेले शहाणे बाहेर येवून आरडाओरड करेपर्यंत दरोडेखोर नजरेआड गेले होते़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुख्य आरोपी होता जामिनावर
दरोड्याच्या या घटनेतील मुख्य आरोपी हा काही दिवसांपूर्वीच अमरावती येथील तुरुंगातून जामिनावर सुटला होता़ कोरोनाच्या संकटामुळे त्याला सोडण्यात आले होते़ त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकला़ विशेष म्हणजे, या दोन साथीदारातील एकाने पोलिसावर जीवघेणा हल्ला केला होता़