पुरातन १ किलो चांदीच्या नाण्यांसह ७ लाखाचा ऐवज लंपास, माहूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 PM2021-07-24T16:21:15+5:302021-07-24T16:27:09+5:30

Robbery in Nanded : व्यापाऱ्याच्या घरी सर्व झोपलेले असताना झाली चोरी

Robbery in Mahur worth Rs 7 lakh with 1 kg silver coins of antiquity | पुरातन १ किलो चांदीच्या नाण्यांसह ७ लाखाचा ऐवज लंपास, माहूर येथील घटना

पुरातन १ किलो चांदीच्या नाण्यांसह ७ लाखाचा ऐवज लंपास, माहूर येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्दे घराचे लोखंडी चॅनल गेट व कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला.

माहूर ( नांदेड ) : शहरातील ब्राम्हण गल्लीत झालेल्या घरफोडीत ७ लाख १९ हजार रुपयांच्या ऐवज लंपास झाल्याची घटना २३ जुलैच्या रात्री घडली. दरम्यान, साई ले-आउट परिसरातील इतर तीन घरीही दरोडेखोरांनी दरोडा घातल्याची माहिती समोर आली असून त्यातील काही जन बाहेरगावी असल्याने त्यांची पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली नाही. सदर घटनेने माहूर शहरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण पसरले आहे.

माहूर शहरातील व्यापारी संतोष राजाभाऊ जोशी व त्यांचे कुटुंबीय २३ शुक्रवारी रात्री जेवण करून झोपी गेल्यानंतर अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या ब्राह्मण गल्ली येथील घराचे लोखंडी चॅनल गेट व कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व जण गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी घरातील ६ लाख १९ हजार रुपये रोख, पुरातन काळातील पुजेची चांदीची नाणी १ किलो किंमत ६७ हजार, लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे ६ ग्रॅमचे चैन किंमत २६ हजार व हातातील चांदीचे कडे १० तोळे किंमत ६ हजार असा एकूण ७ लाख १९ हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला.

२४ जुलै रोजी सकाळी झोपेतून उठल्यानंतर ही बाब लक्षात आली असता संतोष राजाभाऊ जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलीस स्टेशन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या मार्गदर्शनात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध प्रभारी पो.नि.नामदेव मद्दे यांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फिंगर प्रिंट विभागाचे स.पो.नि कंठाळे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वानपथकाचे के.बी.जोंधळे, चालक राजेश चौधरी यांनी घटनास्थळास भेट देऊन श्वानच्या माध्यमातून दरोडेखोरांचा माग घेतला. पुढील तपास प्रभारी पो.नि.नामदेव मद्दे, स.पो.नि अण्णासाहेब पवार, पो.कॉ.साहेबराव सगरोळीकर, पो.कॉ. प्रकाश देशमुख करीत आहेत. चोरट्यांचा छडा लावण्याचे आवाहन माहूर पोलीसासमोर उभे टाकले आहे.

Web Title: Robbery in Mahur worth Rs 7 lakh with 1 kg silver coins of antiquity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.