नांदेडच्या भाग्यनगरमध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:40 PM2018-10-09T12:40:02+5:302018-10-09T12:40:42+5:30
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली.
नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली. यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज व रोख चोरट्यांनी लंपास केला आहे.
भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॅनॉल रस्त्यावर भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यातच मंगळवारी पहाटे जय रेसिडेन्सी मध्ये श्री माचेवाड हे 303 नंबरच्या फ्लॅट मध्ये राहतात. माचेवाड हे सोमवारी आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी औरंगाबाद येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घर साफ केले. लोखंडी टॉमीने कुलूप तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. कपाटाचे दार तोडून त्यामध्ये असलेले दागिने आणि 40 ते 45 हजार रुपयांची रोकड असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे श्री माचेवाड यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डमाले यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानं मुख्य रस्त्यापर्यंत माग काढत गेले नंतर जागेवरच फिरू लागल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ गेले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना ताजी असताना एका टिप्परची बॅटरी तसेच दुचाकीमधील पेट्रोल चोरट्यांनी लंपास केले. अशा घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.