रेल्वेत प्रवाशांचा ऐवज पळविणारी महिलांची टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:16 PM2018-09-20T17:16:58+5:302018-09-20T17:18:17+5:30
रेल्वे प्रवासात प्रवाशांचा ऐवज पळविणाऱ्या महिलांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा परिसरातून अटक केली़
नांदेड : रेल्वे प्रवासात प्रवाशांचा ऐवज पळविणाऱ्या महिलांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा परिसरातून अटक केली़ त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे़
रेल्वे प्रवासात बेसावध असलेल्या महिला प्रवाशांशी ओळख करुन त्यांच्याजवळील किमती साहित्य लंपास करणारी महिलांची टोळी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाली होती़ औंढा तालुक्यातील प्रवीण लोंढे हे कुटुंबासह अकोला- परळी ते अकोला पॅसेंजरने परभणी ते धामणी असा प्रवास करीत होते़ यावेळी सर्वसाधारण डब्यात गर्दी होती़ गर्दीचा फायदा घेत काही महिलांनी त्यांच्या खिशातील पर्स काढून घेतली़ खिशात पर्स नसल्याचे लक्षात येताच लोंढे यांनी पूर्णा पोलिसांशी संपर्क साधला़
त्यानंतर नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ पोनि़अशोक जाधव यांनी सहकाऱ्यांसह पूर्णा परिसरात धाव घेतली़ त्यानंतर पूर्णा तालुक्यातील कमलापूर भागातून सहा महिलांना ताब्यात घेतले़ त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पर्स व रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली़ या प्रकरणी अंजली भोसले, राधिका भोसले, प्रीती शिंदे, राधा शिंदे, सोनू भोसले आणि अमीन भोसले या सहा महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या सर्व महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़
रेल्वेत गर्दी असलेल्या डब्यात या महिला एकाचवेळी चढायच्या़ त्यानंतर एखाद्या प्रवाशाला हेरुन नजरेच्या इशाऱ्याने त्याला घेरायच्या़ त्यानंतर गर्दीतून वाट काढत असल्याचे दाखवित त्या प्रवाशाला खेटायचे़ त्याचवेळी एकीने प्रवाशाचा ऐवज लंपास करीत दुसरीच्या ताब्यात द्यायचा़