मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार पावणे तीन कोटींची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 06:16 PM2018-07-12T18:16:15+5:302018-07-12T19:55:31+5:30
एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
- विशाल सोनटक्के
नांदेड : एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मराठवाड्यातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना २ कोटी ८३ लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भातील पत्र नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी प्राप्त झाले आहे.
ही मदत महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याबाबत देण्यात येणार आहे. ही रक्कम बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच रक्कम खात्यात जमा करताना कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याबरोबरच नुकसान भरपाईचे वाटप केल्यानंतर सदर लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रक्कमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहे.
नांदेड-लातूरला सर्वाधिक नुकसानभरपाई
एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच अवेळी पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मराठवाड्यातील ३ हजार ८८१ हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला होता. शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईत लातूर जिल्ह्याला सर्वाधिक ९२ लाख ७६ हजार तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८५ लाख ४० हजार रुपये मिळणार आहेत. औरंगाबाद १० लाख २९ हजार, जालना- १२ लाख २९ हजार, परभणी- ७० लाख, ७ हजार, बीड- ६ लाख ७७ हजार, हिंगोली ५ लाख १९ हजार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन बाधित शेतकऱ्यांना २४ हजारांची नुकसान भरपाई मिळणार आहे.