नांदेड जिल्ह्यातील ८३ हजार ९५० शेतक-यांना ३९६ कोटी ४२ लाख रुपयांची कर्जमाफी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:56 PM2017-12-12T18:56:14+5:302017-12-12T18:57:37+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली.
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली़
राज्य शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून उल्लेख केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांना दिवाळीत कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती़ परंतु आॅफलाईन आणि आॅनलाईनचा अनेक दिवस गोंधळ सुरु होता़ कर्जमाफीसाठीचे अर्ज दाखल करताना शेतक-यांच्या नाकी नऊ आले़ त्यात बँकाकडूनही काही ठिकाणी शेतक-यांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला. या योजनेत शेतक-यांना १ लाख ५० हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ११ डिसेंबर २०१७ अखेर २ हजार ३३१ शेतक-यांच्या खात्यात ७ कोटी ६ लाख २२ हजार ९८६ रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात २४ हजार ३८० शेतक-यांच्या खात्यात ३० कोटी १३ लाख ९३ हजार ९०१ रुपये जमा करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत, ग्रामीण बँकांकडून ११ डिसेंबर २०१७ अखेर ५७ हजार २३९ शेतक-यांच्या खात्यात ३५९ कोटी २१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यात एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा केले आहेत.