नांदेडमध्ये डायलेसिससाठी रूग्णांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:30 AM2018-05-17T00:30:11+5:302018-05-17T00:30:11+5:30

जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून याचा सर्वाधिक त्रास डायलेसिस करणा-या रूग्णांना होत आहे़ खाजगी रुग्णालयात हजारो रुपये मोजून त्यांना तपासणी करावी लागत आहे़

Runway of patients for dialysis in Nanded | नांदेडमध्ये डायलेसिससाठी रूग्णांची धावपळ

नांदेडमध्ये डायलेसिससाठी रूग्णांची धावपळ

Next
ठळक मुद्देकंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप : जिल्ह्यातील आरोग्यसेवा झाली विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ८ मे पासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून याचा सर्वाधिक त्रास डायलेसिस करणा-या रूग्णांना होत आहे़ खाजगी रुग्णालयात हजारो रुपये मोजून त्यांना तपासणी करावी लागत आहे़
शहरातील श्यामनगर येथील महिला रूग्णालयात किडनीचा आजार असणा-या रूग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत डायलेसिसची सेवा दिली जाते. त्यामुळे येथील रूग्णालयात महिन्याकाठी जिल्हाभरातील जवळपास १५० ते २०० रूग्ण डायलेसिस करण्यासाठी येतात.
रूग्णालयात डायलेसिस करण्यासाठी येणा-या रूग्णांना सेवा मिळावी यासाठी या ठिकाणी तीन कर्मचा-यांसह अन्य ३ कंत्राटी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे. परंतु, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गतचे कर्मचारी संपावर असल्यामुळे येथील डायलेसिसची सेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे़ त्यामुळे डायलेसिससाठी येणा-या रुग्णांना आल्यापावली माघारी जावे लागत आहे़ त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात जादा पैसे देवून डायलेसिस करावे लागत असल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, ८ मे पासून सुरु असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे़ अनेक ठिकाणी कर्मचारीच नसल्यामुळे रुग्णालये ओस पडली आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना उपचारासाठी नांदेडातील खाजगी रुग्णालये गाठावी लागत आहेत़ याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे़

खाजगी रूग्णालयात येतो १५०० रूपये खर्च
किडनीचा त्रास असणाºया प्रत्येक रूग्णाला एका महिन्यात जवळपास आठ वेळा डायलेसिस करावे लागते. परंतु, शहरातील डायलेसिस केंद्र सध्या बंद असल्याने रूग्णांना यासाठी दीड हजार रूपये खर्च करावे लागत आहेत. तसेच डायलेसिस करण्यासाठी आवश्यक डायलेजर शासकीय रूग्णालयात मोफत दिले जाते. परंतु, बाजारात याची किंमत एक हजार ५० रूपये इतकी आहे. या डायलेजरचा वापर फक्त पाच वेळा केला जावू शकतो. परंतु, रूग्णांना दिल्या जाणारी मोफत सेवा सध्या बंद असल्यामुळे हाही खर्च रूग्णांना सोसावा लागत आहे.
कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांच्या वतीने आरोग्य उपकेंद्रांतर्गत रूग्णांना विविध सेवा दिली जाते. यामध्ये महिलांची प्रसूती, गरोदर मातांचे लसीकरण यासह अन्य आवश्यक सेवा दिल्या जातात. परंतु, आंदोलनाचा परिणाम आता या सेवांवरही होताना दिसत आहे.

कंत्राटी कर्मचा-यांच्या मागण्या संदर्भात अद्यापपर्यंत काही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने १८ मे रोजी नाशिक येथून लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे सचिव प्रदीप देशमुख यांनी दिली. त्यानंतर हा लाँगमार्च २८ मे रोजी मुंबई येथे पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच २८ मे रोजी सदर आंदोलनात १०२ व १०८ रूग्णवाहिका कर्मचारी सहभागी होणार असल्याने आंदोलन तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Runway of patients for dialysis in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.